Tuesday, September 9, 2025
घरमहाराष्ट्रदहिसर टोल नाका वर्सोवा पुलासमोरील नर्सरी जवळ स्थलांतरित करण्यात येणार -- परिवहन...

दहिसर टोल नाका वर्सोवा पुलासमोरील नर्सरी जवळ स्थलांतरित करण्यात येणार — परिवहन मंत्री प्रताप सरनाईक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न

प्रतिनिधी : मुंबई महानगर क्षेत्रांत प्रवेश करताना मीरा-भाईंदर शहराच्या वेशीवर असलेल्या दहिसर टोल नाक्या मूळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होऊन अनावश्यक इंधनाचा अपव्यय होतो. तसेच वाहनांच्या प्रदुषणामुळे पर्यावरणाची देखील हानी होते. यास्तव दहिसर टोल नाका तेथुन पुढे २ किलोमीटर अंतरावरील वर्सोवा पुलासमोरील नर्सरी जवळ दिवाळीपूर्वी स्थलांतरित करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री श्री. प्रताप सरनाईक यांनी दिली . उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे यांच्याकडे झालेल्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले. या बैठकीला दहिसरचे आमदार प्रकाश सुर्वे, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक मनोज जिंदल, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे सुहास चिटणीस, वसई- विरार आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त निकेत कौशिक, IRB चे ठेकेदार विरेंद्र म्हैसकर इतर वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते .

मंत्री सरनाईक म्हणाले की, श्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी राज्यातील अनेक टोल नाके रद्द केले तसेच सर्व टोल नाक्यावरील लहान वाहनांना टोलमाफी केली. या निर्णयाचे सर्वसामान्य जनतेने स्वागत केले आहे. दहिसर टोल नाक्यामुळे मिरा भाईंदर शहरातील १५ लाख स्थानिक नागरिक, वाहनचालक, तसेच मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता. यामुळे प्रवासाचा वेळ अर्धा ते एक तास वाढत असून इंधनाचा विनाकारण अपव्यय होत होता.

या कारणास्तव मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या हद्दीतील हा टोल नाका शहराच्या आत असल्याने, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि नागरिकांना दिलासा देण्यासाठी हा टोल नाका २ किलोमीटर अंतावर हलवावा. यामुळे मीरा-भाईंदर व मुंबई दरम्यानचा प्रवास अधिक सुलभ होईल. अशी आग्रही मागणी स्थानिक लोकप्रतिनिधी व परिवहन मंत्री श्री. प्रताप सरनाईक यांनी केली होती.

या संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक घेऊन हा प्रश्न सोडवला आहे. उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ या बाबतचा प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे पाठवेल, तो प्रस्ताव केंद्रीय वाहतूक मंत्रालयाकडून मंजूर होऊन आल्यानंतर टोलनाका स्थलांतरणाची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. यासाठी एक ते दीड महिना वेळ लागेल, त्यामुळे या दिवाळीपूर्वी सदर टोलनाका स्थलांतरित करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. त्यामुळे मिरा-भाईंदर महापालिका क्षेत्रातील स्थानिक नागरिकांना टोलमुक्त प्रवासाचा भेट शिवसेनेच्यावतीने मिळेल* आणि वाहतुकीवरील ताण कमी होईल, असा विश्वासही परिवहन मंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments