प्रतिनिधी : राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘लाडकी बहीण’ योजनेत तब्बल २६ लाख अपात्र लाभार्थी लाभ घेत असल्याचे प्राथमिक माहिती तपासणीत उघड झाली आहे. माहिती व तंत्रज्ञान विभागाने ही माहिती उपलब्ध करून दिली असून, हे लाभार्थी राज्यातील सर्व जिल्ह्यांतील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता या अपात्र लाडक्या बहिणी लाडक्या भावावर नाराज होणार यात शंका नाही. मात्र लाडक्या बहिणींनी अजून तरी घाबरण्याचे कारण नाही कारण लाडक्या भावांनी या प्रकरणी अजून अंतिम निर्णय घेतला नाही.
अर्जांची छाननी प्रक्रियेत ही बाब समोर आली असून, संबंधित लाभार्थ्यांची कागदपत्रे तपासण्याचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. या पार्श्वभूमीवर अपात्रांना देण्यात आलेला लाभ थांबवून पुढील कार्यवाही केली जाणार आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसारच पुढील निर्णय घेतला जाईल. अशी माहिती समोर आली आहे.
‘लाडकी बहीण’ ही योजना राज्यातील महिलांना थेट आर्थिक मदत मिळावी यासाठी सुरू करण्यात आली. मात्र, मोठ्या प्रमाणावर झालेल्या अपात्रांचा पर्दाफाश झाल्याने योजनेची विश्वासार्हता धोक्यात येत असून, पारदर्शकतेसाठी सरकारवर दबाव वाढला आहे.