कराड(प्रताप भणगे) : कराड तालुक्यातील उंडाळे – सवादे रोडवरील एका वळणावर मोठ्या प्रमाणावर खड्डा पडला असून त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने डांबराऐवजी मुरमाचे मोठे दगड टाकून खड्डा बुजवण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे वाहनधारकांसाठी मोठा धोका निर्माण झाला आहे. दगड उडून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.
सदर रस्ता अलीकडेच पंतप्रधान सडक योजनेअंतर्गत मनव ते कोळेवाडी दरम्यान ३ कोटी रुपयांचा खर्च करून तयार करण्यात आला होता. मात्र काही दिवसांतच खड्डे निर्माण झाले असून त्यावर डांबराऐवजी मुरमाचे दगड टाकण्याची नवी पद्धत अवलंबल्याचे दिसून येते.
रस्ता डांबराने पूर्ववत दुरुस्त करावा, अशी नागरिकांची मागणी जोर धरत आहे. “हा दगड उडून इतर वाहनधारक जखमी होण्याचा धोका मोठा आहे. लवकरात लवकर डांबरी दुरुस्ती करावी,” अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने योग्य दुरुस्ती करून वाहनधारकांच्या सुरक्षेची काळजी घेणे अत्यावश्यक आहे.