Tuesday, September 9, 2025
घरमहाराष्ट्रमराठी पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फिनिक्स पुरस्काराने सन्मान; ...

मराठी पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फिनिक्स पुरस्काराने सन्मान; फिनिक्स पुरस्कारामुळे काम करण्याचे, जबाबदारी पार पाडण्याचे बळ द्विगुणित – मुख्यमंत्री

मुंबई – मराठी पत्रकार संघाने दिलेला आणि गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या हस्ते मिळालेल्या फिनिक्स पुरस्कारामुळे काम करण्याचे आणि पदाची जबाबदारी सांभाळण्याचे बळ द्विगुणित झाल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मराठी पत्रकार संघाच्या वतीने येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित कार्यक्रमात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फिनिक्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच त्यांच्या जीवनावर आधारित व्हिडिओ बुकचे प्रकाशन करण्यात आले. या पुरस्कार सन्मानाला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.

जेव्हा आपल्या हातून एखादे सत्कार्य घडते, तेव्हा त्याचा गौरव स्वीकारावा असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारणे ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. पत्रकार संघाचे आणि संपादक मंडळाचे मी मनःपूर्वक आभार मानतो. हा सोहळा अत्यंत नीटनेटका, कल्पकतेने सजलेला आहे. पत्रकार आणि राजकारणी हे लोकशाहीच्या गाड्याची दोन चाके आहेत. ही दोन चाके एकमेकांसोबत चालली तरच लोकशाही योग्य रुळावर राहते. टीका करणे हा पत्रकारांचा अधिकार आहे, पण त्याच वेळी आमची बाजूही ऐकून घ्यावी. लोकशाही प्रगल्भ होण्यासाठी पत्रकारितेचे स्वातंत्र्य अबाधित राहिले पाहिजे. पत्रकारांना भेडसावणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी सरकार नेहमीच त्यांच्या पाठीशी आहे. आजच्या स्पर्धात्मक युगात पत्रकारिता अधिक कठीण झाली आहे. कोविडनंतर तर आव्हान अधिक वाढले. पत्रकार दिवस-रात्र रस्त्यावर असतात. हा लोकशाहीचा महत्वाचा स्तंभ मजबूत राहावा म्हणून सरकारकडून शक्य ती सर्व मदत केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, सकारात्मक विचारसरणीने अनेक पिढ्यांसाठी उपयुक्त ठरणारी कामे करता आली. जलयुक्त शिवार योजना, शेतकऱ्यांची निराशा दूर करणारे उपक्रम ही गुरुदेवांच्या प्रेरणेतून शक्य झाली. आर्ट ऑफ लिव्हिंग कार्यकर्त्यांनी सरकारसोबत खांद्याला खांदा लावून जलसंधारणाच्या कामांत योगदान दिले. भारतीय योग, आयुर्वेद, चिकित्सा व परंपरांना जागतिक स्तरावर मान्यता मिळवून देण्यात श्री श्री रविशंकर यांचे मोठे योगदान आहे. भारतीय विचार जगभर पोहचवण्याचे आणि मानवतेचा धर्म शिकवण्याचे काम त्यांनी केले. त्यांच्या हस्ते मिळालेला हा पुरस्कार माझ्यासाठी विशेष अभिमानाची बाब असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांनी यावेळी पत्रकार यांनी सामाजिक कार्यात दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचे कौतुक केले.

कार्यक्रमाला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, कौशल्य विकास, रोजगार व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, अध्यात्म गुरू श्री श्री रविशंकर, मराठी पत्रकार संघाचे निमंत्रक किरण जोशी, सकाळ समूहाचे संपादक निलेश खरे, लोकमतचे समुह संपादक विजय बाविस्कर, ABP माझाच्या संपादक सरीता कौशिक, तसेच पुढारीचे संपादक विवेक गिरधारी यांच्यासह पत्रकार व अनुयायी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments