मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी मार्केटिंग फेडरेशन, मस्जिद बंदर येथील काही अधिकाऱ्यांवर आर्थिक गैरव्यवहार आणि फसवणुकीचा आरोप करत वाशी येथील व्यापारी श्री. जयेश संतोष मोरे यांनी मुख्यमंत्री आणि प्रशासनाकडे तक्रार केली आहे. टेंडर प्रक्रियेत अनियमितता करून आर्थिक मागणी करण्यात आल्याचा त्यांनी गंभीर आरोप केला आहे.
श्री. मोरे हे वाघाणी ट्रेडिंग कंपनीचे भागीदार असून त्यांनी वाशीच्या APMC मार्केटमधील R/17/18 या गाळ्यासाठी डिसेंबर २०२४, मे २०२५ आणि जुलै २०२५ या तीन वेळा टेंडर भरले होते. त्यापैकी पहिल्या आणि तिसऱ्या वेळेस त्यांचे टेंडर मंजूर झाले तरीही फेडरेशनच्या अधिकाऱ्यांकडून मंजुरीसाठी ₹७,००,००० इतकी “लाच” मागण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ही मागणी फेडरेशनचे जनरल मॅनेजर नितीन यादव व असिस्टंट मॅनेजर मिलिंद माने यांच्या नावाने करण्यात आली असल्याचे श्री. मोरे यांनी पत्रात नमूद केले आहे. रक्कम देण्यास नकार दिल्यानंतर टेंडर नामंजूर करण्यात आले आणि त्यानंतर अनामत रक्कम परत न मिळाल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच, त्यांच्या निविदेची माहिती न देता दुसऱ्या कंपनीला टेंडर दिले गेले, ज्यामुळे त्यांना मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागला, असे त्यांनी पत्रात स्पष्ट केले आहे. या प्रकरणी सात दिवसांत टेंडर मंजुरीचा ताबा किंवा नुकसानभरपाई मिळावी, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी प्रशासनाला दिला आहे. त्यांनी ही तक्रार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री जयकुमार रावल यांच्यासह संबंधित विभागीय अधिकाऱ्यांनाही पाठविली आहे. फेडरेशनच्या कार्यालयाकडून यावर कोणतीही प्रतिक्रिया मिळालेली नाही. प्रशासन पुढे कोणती कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.