प्रतिनिधी — आपला व्यवसाय उघड्यावर करीत असलेल्या ८३गटई चर्मोद्योग कामगारांना ठाणे महानगर पालिकेच्या विविध भागात स्टाॅल उभारण्यास ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी मंजुरी दिली आहे.या गटई चर्मोद्योग कामगारांना येत्या दोन महिन्यात स्टालचे परवाने पालिकेच्या वतीने देण्यात येतील असे आश्वासन सौरभ राव यांनी राष्ट्रीय चर्मकार संघास दिले आहे.
राष्ट्रीय चर्मकार संघाचे अध्यक्ष-माजी आमदार बाबुराव माने यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने नुकतीच ठाणे मनपा कार्यालयात आयुक्तांची भेट घेतली.त्यावेळी ही मंजुरी आयुक्तांनी दिली.उन वारा पावसाची पर्वा न करता ठाणे मनपाच्या विविध भागात पदपथांवर गटई चर्मोद्योग कामगार हे आपला व्यवसाय करीत आहेत.या सर्वांना स्टाॅलसाठी परवाने देण्याचा विषय गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत.ठाणे महापालिकेच्या महासभेत १९३ गटई चर्मोद्योग कामगारांना स्टालसाठी परवाने देण्याचा विषय २००५ मध्येच मंजूर झालेला आहे.या पैकी ११० गटई चर्मोद्योग कामगारांना २००८मध्ये स्टाॅलचे परवाने दिले आहेत.आता इतकी वर्षे मंजूर स्टाॅलपैकी आणखी ८३ गटई चर्मोद्योग कामगारांना स्टाॅलसाठी परवाने न देणे अतिशय अन्याय करण्यासारखे आहे.या गटई चर्मोद्योग कामगारांची सत्वपरीक्षा पाहण्यासारखे आहे. आता परवाने देण्यास विलंब झाला तर राष्ट्रीय चर्मकार संघ मोर्चा काढेल असा इशारा बाबुराव माने यांनी दिला.तसेच ठाणे मनपाच्या महासभेने २००५ मध्ये म्हणजे २० वर्षांपूर्वीच स्टाॅलला परवाने देण्याचा निर्णय घेतलेला आहे.आता विलंब म्हणजे नियमभंग केल्यासारखे होईल याकडेही बाबुराव माने यांनी आयुक्तांचे लक्ष वेधले .म्हणून आता गटई चर्मोद्योग कामगारांना त्वरीत स्टाॅलचे लायसन्स वितरीत करा अशी जोरदार मागणी बाबुराव माने यांनी आयुक्तांकडे यावेळेस बोलताना केली.त्यावेळेस आयुक्तांनी इतका झालेला विलंब लक्षात घेऊन गटई चर्मोद्योग कामगारांच्या या प्रलंबित मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करुन स्टाॅल्सना लायसन्स येत्या दिड-दोन महिन्यात देण्याचे आश्वासन दिले.या बैठकीस राष्ट्रीय चर्मकार संघाचे मुंबई अध्यक्ष विलास गोरेगांवकर,माजी अध्यक्ष जगन्नाथ खाडे,जालना प्रभारी परशुराम इंगोले,बाळासाहेब गायकवाड, ठाणे महिला अध्यक्षा सुनिता कांबळे,ठाणे सरचिटणीस निकम,सचिन रामुगडे आदी उपस्थित होते.येत्या दोन महिन्यात स्टाॅलचे परवाने मिळणार असल्याने ठाण्यातील चर्मकार व्यावसायिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
ठाण्यात ८३ गटई चर्मोद्योग कामगारांना स्टाॅलचे परवाने मिळणार
RELATED ARTICLES