सातारा(अजित जगताप ) : आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या विविध मागण्यांबाबत आज सातारा जिल्हाधिकारी कार्यालय समोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला वाढता पाठिंबा मिळत आहे. रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते जयवंत कांबळे यांनी आंदोलकांची भेट घेऊन पाठिंबा जाहीर केला.
दिनांक १४ मे रोजी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या समवेत बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये मागण्यांबाबत एका महिन्यानंतर अंमलबजावणी करू असे आश्वासन दिले. परंतु, तीन महिन्याचा कालावधी होऊन सुद्धा महाराष्ट्रातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या आर्थिक मागण्या जैसे थे अवस्थेत आहे.
माननीय अभय यावलकर समितीच्या शिफारसी स्वीकारणे, किमान वेतनातील अध्यय वाढीव फरक देणे, किमान वेतन साठी कमिटीद्वारे नवीन दर लागू करणे, उत्पन्न आणि वसुलीची अट रद्द करणे, दहा टक्के आरक्षणाप्रमाणे भरती करणे, भरती प्रक्रियेमध्ये गट ड चा समावेश करणे, जाचक आकृतीबंधता सुधारणा करणे, उपदान अदायीचे निकष बदलणे, राहणीमान भत्ता शासनाच्या तिजोरीतून मिळणे, कर्मचाऱ्यांचे मासिक नियमित वेतन थेट पद्धतीने बँकेतून मिळणे, व इतर मागण्यांसाठी लोकशाही मार्गाने छातीला बिल्ला लावून हे धरणे आंदोलन आहे. सध्या आंदोलनाला वाढता पाठिंबा मिळत असून सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन लोकशाही मार्गाने केले आहे. यावेळी मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. संघटनेचे अध्यक्ष प्रा. कॉम्रेड तानाजी ठोंबरे, कार्याध्यक्ष कॉम्रेड मिलिंद गणवीर, सरचिटणीस कॉम्रेड नामदेव चव्हाण, संघटन सचिव कॉम्रेड सखाराम दुर्गुंडे, कॉम्रेड ए.बी. कुलकर्णी, कॉम्रेड मंगेश म्हात्रे ,कॉम्रेड उज्वल गांगुर्डे, एडवोकेट कॉम्रेड सुधीर टोकेकर, कॉम्रेड बबन पाटील, कॉम्रेड वसंतराव वाघ ,कॉम्रेड हरिचंद्र सोनवणे, कॉम्रेड अमृत महाजन, एडवोकेट कॉम्रेड राहुल जाधव, कॉम्रेड निळकंठ डोके, कॉम्रेड श्याम चिंचणे, कॉम्रेड तुकाराम भिसे यांच्यासह मान्यवर ग्रामपंचायत कर्मचारी सहभागी झालेले आहेत. लोकशाही मार्गाने होणाऱ्या या ग्रामपंचायतीच्या मागण्या तातडीने पूर्ण करण्यासाठी सर्वच घटक पक्ष आयटकच्या संलग्न असलेल्या महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाला पाठिंबा देत आहेत.
——- ——- ——- —–
फोटो– सातारा जिल्हाधिकारी कार्यालय समोर ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या आंदोलनाला पाठिंबा देताना रिपब्लिकन कार्यकर्ते जयवंत कांबळे (छाया– अजित जगताप सातारा)