मुंबई(रमेश औताडे) : अनंत चतुर्दशी विसर्जनानंतर मुंबईत समुद्र किनाऱ्यावर साचलेला कचरा आणि मूर्तींचे अवशेष पाहता पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याची गरज असल्याचे चित्र समोर आले आहे. दरवर्षी गणपती विसर्जनानंतर हजारो टन कचरा समुद्रात जातो. यात प्लॅस्टिक, थर्माकोल, रंगीत कपडे व रसायने मिसळल्याने समुद्रातील जैवविविधतेला मोठा धोका निर्माण होतो.
यावर्षी मुंबई महापालिकेने कृत्रिम तलाव तयार केले होते. अनेक भाविकांनी तिथे मूर्ती विसर्जित केल्या, मात्र मोठ्या संख्येने मूर्ती समुद्रातच विसर्जित झाल्या. परिणामी किनाऱ्यावर मूर्तींचे तुकडे, सजावट साहित्य व प्लॅस्टिकचा ढिगारा जमा झाल्याचे दिसून आले.
पर्यावरण तज्ज्ञांचे मत आहे की विसर्जनानंतर स्वच्छता मोहिमेसाठी खर्च होणारा निधी आणि श्रम वाचवण्यासाठी मूळातच पर्यावरणपूरक मूर्ती, नैसर्गिक रंग आणि सजावट साहित्य वापरण्याची गरज आहे. तसेच शाळा-कॉलेजांपासूनच विद्यार्थ्यांना ‘ग्रीन गणेशोत्सव’ची जाणीव करून देणे आवश्यक आहे.
नागरिक, सार्वजनिक मंडळे आणि प्रशासन या तिन्ही घटकांनी एकत्रित प्रयत्न केल्यास मुंबईला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाकडे नेणे शक्य होईल, असे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.