Sunday, September 7, 2025
घरमहाराष्ट्रमुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी केली बाप्पाची आरती..!

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी केली बाप्पाची आरती..!

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गिरगांव चौपाटी येथील बृहन्मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाने संयुक्तपणे उभारलेल्या विशेष दालनाला भेट देत विसर्जन होत असलेल्या बाप्पाची आरती केली. यावेळी परदेशी पर्यटकांनी गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीचा थक्क करणारा अनुभव घेतला. तर, थायलंड येथून हा विसर्जन सोहळा अनुभवण्यास आलेल्या पर्यटकांनी आरतीतही सहभाग घेतला. याप्रसंगी, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका आणि पर्यटन विभागाने केलेल्या आयोजनाचे कौतुक केले.

अनंत चतुर्दशीनिमित्त मुंबईतील ऐतिहासिक गिरगाव चौपाटीवर आयोजित गणेश विसर्जनाच्या भव्य सोहळ्याने परदेशी पर्यटकांना मंत्रमुग्ध केले. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा हा अनमोल ठेवा त्यांनी आपल्या हृदयात आणि कॅमेऱ्यात कायमस्वरूपी जतन केला.

गणेश विसर्जनाचा हा भव्य सोहळा याचि देही याचि डोळा पाहण्यासाठी मॉरिशस, कोरिया, अमेरिका, थायलंड, जपान आणि दक्षिण आफ्रिका येथून आलेल्या पर्यटकांनी उपस्थिती दर्शविली होती. या सोहळ्याच्या निमित्ताने आलेल्या पर्यटकांना केवळ मिरवणुकीच्या भव्यतेचे दर्शनच घेता आले नाही, तर त्यांना गणरायाची श्रद्धेने पूजा करणे, आरतीत सहभागी होणे आणि गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात सामील होण्याची संधी मिळाली. पारंपरिक महाराष्ट्रीय वेशभूषेत सज्ज होऊन, ढोल-ताशांच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात हे पर्यटक महाराष्ट्राच्या सांस्कृतिक श्रीमंतीत तल्लीन झाले.

या सोहळ्याला पर्यटन संचालनालयाचे संचालक डॉ बी. एन. पाटील, पर्यटन विभागाचे उपसचिव संतोष रोकडे उपस्थित होते.

परदेशी पर्यटकांच्या मनात रुजली महाराष्ट्राची संस्कृती

या उत्सवाचे साक्षीदार ठरलेल्या एका परदेशी पर्यटकाने आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले, हा सोहळा म्हणजे केवळ उत्सव नाही, तर श्रद्धा, एकता आणि आनंदाचा संगम आहे. लाखो लोक एकाच स्वरात गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष करताना पाहून माझे मन थक्क झाले. अंगावर रोमांच उभे राहिले आणि डोळ्यात आनंदाश्रू तरळले. भारतात येऊन हा अनुभव घेणे म्हणजे माझ्यासाठी स्वप्नवत आहे. अनेक पर्यटकांनी गणरायाच्या मनमोहक मूर्तींसोबत छायाचित्रे काढली आणि या अविस्मरणीय क्षणांना आपल्या कॅमेऱ्यात बंदिस्त केले. महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी या पर्यटकांना गणेशोत्सवाची ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महती समजावून सांगितली.

महाराष्ट्राच्या पर्यटनाला नवी उभारी मिळेल – पर्यटनमंत्री शंभुराज देसाई

गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारस्याचा अविभाज्य भाग आहे. परदेशी पर्यटकांना या उत्सवात सहभागी करून घेणे, हा आपल्या परंपरांचा जागतिक पातळीवर प्रसार करण्याचा एक सशक्त प्रयत्न आहे. यामुळे महाराष्ट्राच्या पर्यटनाला नवी उभारी मिळेल आणि आपल्या सांस्कृतिक वैभवाची ख्याती जगभरात पोहोचेल, असे पर्यटन मंत्री शंभुराज देसाई यांनी म्हटले आहे. तर, आम्ही पर्यटकांसाठी एक असे व्यासपीठ निर्माण केले, जिथे ते या उत्सवाचा थेट अनुभव घेऊ शकले. अशा उपक्रमांमुळे महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक दृढ होईल, असे पर्यटन विभागाचे प्रधान सचिव डॉ.अतुल पाटणे यांनी म्हटले आहे.

पर्यटन संचालक डॉ.बी.एन.पाटील म्हणाले, आमच्या विशेष दालनामुळे पर्यटकांना केवळ मिरवणूक पाहण्याचीच संधी मिळाली नाही, तर ते गणेशोत्सवाच्या खऱ्या भावनेशी जोडले गेले. त्यांनी दाखवलेला उत्साह आणि प्रेम पाहून आम्ही प्रेरित झालो आहोत. ढोल-ताशांच्या गजरात, भक्तिमय वातावरणात आणि गणरायाच्या निरोपाच्या हृदयस्पर्शी क्षणात सहभागी होऊन या पर्यटकांनी महाराष्ट्राच्या आतिथ्यशील संस्कृतीचा अनुभव घेतला. हा अनुभव त्यांच्या मनात आयुष्यभर कोरला जाईल.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments