मुंबई : अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी (दि. ६) संपूर्ण मुंबईत गणेश विसर्जनाचा जल्लोष पाहायला मिळाला. ढोल-ताशांचा गजर, गुलालाची उधळण, भक्तांच्या ओसंडून वाहणाऱ्या गर्दीमुळे शहरभर उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते. पावसाच्या सरी आणि दहशतवादी धमकीचे सावट असतानाही मुंबईकरांनी भक्तिभावाने गणपती बाप्पाला निरोप दिला.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माहितीनुसार, शनिवारी रात्री ९ वाजेपर्यंत शहरातील समुद्रकिनारे, तलाव आणि कृत्रिम विसर्जन स्थळांवर एकूण १८,१८६ गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. यामध्ये १,०५८ सार्वजनिक मंडळांच्या मूर्ती आणि २५८ देवीच्या मूर्ती यांचा समावेश आहे. विसर्जन प्रक्रियेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडल्याची नोंद नाही.
लालबाग परिसर पुन्हा एकदा विसर्जन मिरवणुकीचा केंद्रबिंदू ठरला. लालबागचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी, गणेश गल्लीचा मुंबईचा राजा, काळाचौकीचा महागणपती, रंगारी बदक चाळ गणपती, तेजुकाया यांसारख्या मानाच्या गणपतींच्या मिरवणुका शनिवारी दुपारपासून मार्गस्थ झाल्या.
सायंकाळी लालबागमधील श्रॉफ बिल्डिंग येथे गणेशमूर्तीवर पारंपरिक पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी राफेल विमानाचे मॉडेल दोरीच्या साहाय्याने सादर करून भाविकांचे लक्ष वेधून घेतले.
विसर्जन मिरवणुकांमुळे ६७ ठिकाणी बस मार्ग बदलावे लागले आणि काही सेवा थांबवण्यात आल्या. तरीही चौपाटी, गिरगाव, दादर, जुहू यांसारख्या विसर्जन स्थळी प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. रस्त्यांच्या कडेला, इमारतींच्या गच्चीवर, झाडांवर बसून भाविकांनी गणरायाला निरोप दिला.
कडक सुरक्षाव्यवस्था
गणेश विसर्जनाच्या दिवशी सुरक्षा राखण्यासाठी २१ हजारांहून अधिक पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले. कारण, विसर्जनाच्या आदल्या दिवशी पोलिसांच्या व्हॉट्सॲप हेल्पलाइनवर १४ दहशतवादी आणि ३४ वाहनांमधून ४०० किलो आरडीएक्स घेऊन शहरात प्रवेश केल्याची धमकी मिळाली होती. त्यानंतर अवघ्या २४ तासांत नोएडातील अश्विनीकुमार सुप्रा (वय ५०) याला अटक करण्यात आली. या घटनेनंतर पोलिसांनी सतर्कता वाढवत विसर्जन काळात विशेष बंदोबस्त ठेवला.
भक्तिभावाचा ओलावा
पावसाच्या सरी, वाहतुकीच्या अडचणी असूनही हजारो भाविक विसर्जन मार्गांवर जमले होते. “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” या जयघोषात अनेकांच्या डोळ्यांत पाणी आणि मनात अपार श्रद्धा भरून गेली.