सातारा(अजित जगताप) : छत्रपतींची राजधानी असलेल्या सातारा जिल्ह्यात महायुती मधील भाजप एक नंबरचा पक्ष आहे. स्वबळावरची निवडणूक लढवण्याचा निर्धार कार्यकर्ते व्यक्त करत असतात. परंतु, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नव्या जी.आर. च्या आधारावर मराठा आरक्षणाबाबत मोठा निर्णय घेतला. या निर्णयाचे स्वागत असले तरी देवा भाऊचा सातारा जिल्ह्यात कुठेही बॅनर दिसून आला नाही. याबाबत अनेक जण आश्चर्य व्यक्त करत आहेत.
मुंबई येथे झालेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या ऐतिहासिक आंदोलनानंतर मराठा योद्धा मनोज जरांगे- पाटील यांनी महाराष्ट्र सरकारने जी.आर. पारित केल्यानंतर उपोषण सोडले. हे उपोषण सोडण्यासाठी समितीचे अध्यक्ष मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, छत्रपतींचे वंशज व मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मंत्री माणिकराव कोकाटे, मंत्री उदय सामंत, मंत्री जयकुमार गोरे यांच्यासह अनेकांनी मुंबईतील आझाद मैदानावर हजेरी लावली. कोण जिंकले… कोण हरले.. हे सर्वोच्च न्यायालयात सिद्ध होईल. त्याच्या अगोदरच सर्व वृत्तपत्रांमध्ये पहिल्या पानावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवा भाऊ यांची छबी आणि छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्प अर्पण करताना जाहिरात प्रसिद्ध झाली. असेच बॅनर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झळकले आहेत. विशेषता मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, मराठवाडा व कोकणामध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी तशा पद्धतीने बॅनर झळकवले आहेत. मराठा आरक्षणाबाबत महायुतीच्या सर्वच नेत्यांनी प्रयत्न केले आहेत. तरी ही मराठा आरक्षणाबाबत भाजप बद्दल मराठा समाजाचा असलेला राग
निवळण्यासाठी देवा भाऊ धावून आले आहेत. असे दाखवण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक वृत्तपत्राच्या माध्यमातून जाहिरात देऊन केला आहे. हे सुद्धा लपून राहिलेले नाही. भाजपच्या नेत्यांनी सुद्धा प्रसारमाध्यमाशी बोलताना जाणीवपूर्वक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख करून मराठा समाजाची समजूत काढली. हे जरी खरे असले तरी छत्रपतींची राजधानी असलेल्या सातारा जिल्ह्यात एकाही ठिकाणी देवा भाऊ ही जाहिरात बॅनरबाजी दिसून आलेली नाही.
भारतीय जनता पक्षा मधील साधा कार्यकर्ता त्याची निवड झाली की मोठा जल्लोष करून शिवतीर्थावर पेढे वाटप केले जातात. स्वागताचे व अभिनंदनचे बॅनर लावले जातात. या ठिकाणी मराठा आरक्षण देऊन सुद्धा देवा भाऊंचा अनेकांना बॅनर बाजी न करता विसर पडलेला आहे. ही खंत जुन्या जाणत्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना अस्वस्थ करत आहे. प्रसिद्धी माध्यमातून अनेकदा मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , छत्रपतींचे थेट वंशज खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व ओ.बी.सी. नेते भरत लोकरे, सकल मराठा समन्वय व ओ.बी.सी. रिपब्लिकन पक्ष कार्यकर्ते यांच्यासह मान्यवरांनी याबाबत प्रतिक्रिया दिलेली आहे. भारतीय जनता पक्ष सध्या सातारा जिल्ह्यात एक नंबरचा पक्ष असून सुद्धा देवा भाऊ ही बॅनरबाजी का होऊ शकली नाही? याचा आता शोध घेणे अपेक्षित आहे. सर्वधर्मसमभाव प्रामाणिकपणाने मानणाऱ्या सातारा जिल्ह्यात कधीही जातीय तणाव निर्माण झाला नसला तरी अनेकदा काही घटनांना खतपाणी घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याबाबत ठोस कारवाई होऊ शकलेली नाही. हे सुद्धा सातारकरांनी अनुभवले आहे. हे खंत अनेकांच्या मनात आहे. सातारा जिल्ह्यामध्ये महायुतीचे आठ आमदार त्यापैकी चार मंत्री यामध्ये भाजपचे दोन मंत्री आहेत. एवढा मोठा पसारा असून सुद्धा देवा भाऊ बॅनरबाजी होऊ शकलेली नाही. हे आता स्पष्टपणे जाणवू लागलेले आहे. हे असे घडण्यामागे नेमके कोणते राजकारण आहे की जाणीवपूर्वक सातारा जिल्ह्यात देवा भाऊंना प्रोजेक्ट केले जात नाही.? याबद्दल आता प्रश्न निर्माण झालेला आहे. याचे उत्तर मिळणे अपेक्षित आहे.
—— ——- —— —– —–
फोटो- सातारा जिल्हा वगळता हीच बॅनरबाजी संपूर्ण महाराष्ट्रात दिसून आली