प्रतिनिधी : लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो गणेश भक्तांची गर्दी उसळते. परंतु यंदा या गर्दीतून निर्माण झालेला गोंधळ आणि सुरक्षेतील त्रुटींमुळे अनेक भक्त हतबल झाले आहेत. सुरक्षारक्षकांनी एका गणेशभक्ताला जोरात ओढल्याने त्याच्या खांद्यावर बसलेली चिमुकली खाली कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली. ही घटना काही क्षणात घडली असली तरी यामुळे उपस्थित भक्तांमध्ये संताप आणि असहायतेची भावना निर्माण झाली आहे.
महिलांशीही चुकीची वर्तणूक केल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. दर्शनासाठी वेगळ्या रांगांची व्यवस्था असली तरी ती केवळ श्रीमंत, सेलिब्रिटी किंवा नवसासाठी विशेष रांगेपुरती मर्यादित राहिल्याने सामान्य भक्तांसाठी कोणतेही योग्य नियोजन नाही. “गणराया हा सर्वांचा असतो, मग ही वेगळी वागणूक का?” असा सवाल अनेकांनी उपस्थित केला आहे.
तसेच, गर्दीच्या संधीचा फायदा घेत चोरीच्या घटनाही मोठ्या प्रमाणात वाढल्याच्या तक्रारी आहेत. अनेक वेळा गळ्यातील सोन्या-चांदीच्या वस्तू चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत. काही भक्तांनी देणगी स्वरूपात मदतीचा हात पुढे केला असताना दुसरीकडे त्यांच्या गळ्यातील वस्तू चोरीला गेल्याच्या घटना मन हेलावून टाकणाऱ्या आहेत.
दरम्यान, अनेक भक्तांचा आरोप आहे की, “लालबागचा राजा फक्त श्रीमंत आणि प्रसिद्ध व्यक्तींसाठी आहे का?” अशा चर्चा समाजमाध्यमांवर तापल्या आहेत. नवसासाठी येणाऱ्यांसाठी एक रांग, सेलिब्रिटींसाठी एक आणि श्रीमंतांसाठी वेगळी रांग अशी व्यवस्था असताना गोरगरीब भक्तांनी काय करावे, हा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
याउलट मुंबईतील इतर गणपती मंडळे – जी.एस.बी. गणपती किंवा बाजूच्या गल्लीतील मुंबईचा राजा यांचे उत्तम नियोजन आणि सुरक्षिततेसाठी प्रसिद्ध आहेत. सोन्याने मढवलेले गणपती असले तरी तेथे भक्तांना व्यवस्थित दर्शन मिळते आणि प्रसाद देखील सुरळीत दिला जातो. मग लालबागच्या राजाकडे अशी व्यवस्था का नाही, यावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.
यावर उपाय म्हणून प्रशासनाने तत्काळ नियमावली तयार करून सुरक्षेचे मानदंड ठरवावे, गर्दी नियंत्रणासाठी सुयोग्य नियोजन करावे आणि महिलांसह सर्व भक्तांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करावे, अशी मागणी जोर धरत आहे.
लालबागचा राजा लाखो भक्तांचा श्रद्धास्थान असला तरी “खऱ्या अर्थाने मुंबईचा राजा बाजूच्या गल्लीतील गणरायाच आहे” अशी चर्चा आता नागरिकांमध्ये रंगू लागली आहे. गणपती बाप्पा सर्वांचा आहे – मग त्याच्या दर्शनासाठी समान संधी आणि सन्मान का मिळू नये, हा खरा सवाल आहे. प्रशासनाने लवकरच ठोस पावले उचलली नाहीत, तर भक्तांचा रोष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.