Monday, September 8, 2025
घरमहाराष्ट्रस्व.राजाराम डाकवे (तात्या) निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर

स्व.राजाराम डाकवे (तात्या) निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर

तळमावले/वार्ताहर : पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टने स्व.राजाराम डाकवे (तात्या) यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त आयोजित केलेल्या निबंध स्पर्धेला संपूर्ण महाराष्ट्रातून उत्स्फुर्त आणि उदंड प्रतिसाद मिळाला. वडिलांविषयी फारसं कोणी लिहित नाही म्हणून त्यांच्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि त्या भावना एकत्र करण्यासाठी या निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असल्याची माहिती ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष संदीप डाकवे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे. यावेळी ट्रस्टचे मार्गदर्शक प्रा.ए.बी.कणसे, उपाध्यक्ष आप्पासोा निवडूंगे, सचिव रेश्मा डाकवे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
स्वाती पांडूरंग कुंभार (वाळी-पुणे), गायत्री यशवंत चाळके, आत्माराम जाधव (सुपने-पुणे) यांना अनुक्रमे प्रथम, व्दितीय, तृतीय क्रमांक देण्यात आला आहे. डाॅ.राजेश जोशी (सातारा), जितेंद्र शंकर चौधरी (वाई) यांना विशेष प्रावीण्य पारितोषिक देण्यात येणार आहे. प्रथम तीन क्रमांकाना आकर्षक स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्र आणि पुस्तक तर सर्व सहभागी स्पर्धकांना सहभागाचे डिजीटल प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
साहित्य संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी यापूर्वी स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने पुस्तकांचं झाड, मान्यवरांचे स्वागत पुस्तकाने, भित्ती चित्र काव्य स्पर्धा, प्रातिनिधिक काव्यसंग्रह प्रकाशन, महिलांना प्रेरणादायी पुस्तकांचे वाटप, कॅलिग्राफीतून अक्षरसंस्कार, गणेश-नवरात्र वार्तांकन स्पर्धा, स्पंदन उत्कृष्ट दिवाळी अंक स्पर्धा, स्व.राजाराम डाकवे (तात्या) साहित्य पुरस्कार असे वाचन चळवळीला हातभार लावणारे उपक्रम राबवले आहेत. याशिवाय स्पंदन एक्सप्रेस मासिकाच्या माध्यमातून लिहण्यासाठी वाचकांना एक व्यासपीठही निर्माण केले आहे.
स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टने शेकडो नावीण्यपूर्ण समाजोपयोगी उपक्रम राबवत आपल्या कामाची कर्तृत्वमुद्रा समाजमनावर उमटवली आहे. या कामाची दखल घेत स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टला सातारा जिल्हा परिषदेचा भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार, राज्यस्तरीय सेवाव्रती पुरस्कार, यशवंतराव चव्हाण गौरव पुरस्कार इ.नी गौरवण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments