कराड(प्रताप भणगे) – पुणे बेंगलोर महामार्गावर सहा पदरीकरणांतर्गत कराड नजीक कोल्हापूर नाका ते नांदलापूर दरम्यान होत असलेल्या सिंगल पिलर वरील सहा पदरी उड्डाण पुलाचे सेगमेंट बसवण्याचे काम आज पूर्ण झाले. आज धोंडेवाडी येथील कास्टिंग यार्ड मधून या उड्डाणपुलाचा शेवटचा सेगमेंट कराड येथे आणण्यात आला. विधिवत पूजन करून कोल्हापूर नाक्यावर शेवटच्या गाळ्यात आज सेगमेंट बसवण्यात आला.
डी पी जैन कंपनीचे तत्कालीन व्हाईस प्रेसिडेंट प्रदीप कुमार जैन व प्रोजेक्ट मॅनेजर सत्येंद्र कुमार वर्मा आणि उड्डाणपूलाचे इन्चार्ज सौरभ घोष यांच्या कार्यकाळात या उड्डाणपुलाचे काम सुरू होते गेल्या काही महिन्यापासून डी पी जैन कंपनीच्या व्यवस्थापनाने सध्याच्या कामाची जबाबदारी अन्य काही जणांच्या कडे सोपवलेली आहे.
उड्डाण पुलाच्या दोन्ही बाजूचा भराव मिळून सुमारे पाच किलोमीटर अंतर असलेल्या या युनिक उड्डाण पुलाच्या एकूण 92 पिलर वर 1 हजार 223 सेगमेंट बसवण्यात आले आहेत. या पुलाचे दोन आक्टोंबर 2023 पासून दोन टप्प्यात काम सुरू करण्यात आले होते. पहिल्या टप्प्यात हॉटेल ग्रीन पार्क ते ढेबेवाडी फाटा तर दुसऱ्या टप्प्यात नोव्हेंबर 2023 पासून ढेबेवाडी फाटा ते कोल्हापूर नाका दरम्यान सेगमेंट बसवण्याचे काम सुरू झाले होते.
या उड्डाणपूलाला 40 मीटरचे 74, 31 मीटरचे 6 तर 30 मीटरचे 11 असे एकूण 91 गाळे आहेत. 40 मीटरच्या गाळ्यात 14 तर 30 व 31 मीटरच्या गाळ्यात 11 सेगमेंट बसवण्यात आले आहेत.
आदानीचे कंपनीचे अधिकारी, सेफ्टी इन्चार्ज महेश चाबूस्कवार, प्रकल्प अधिकारी नागेश्वर राव, डी पी जैन कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर अशोक जराळे व त्यांचे टीम यावेळी उपस्थित होते. सदर उड्डाणपुलाचे सेगमेंट धोंडेवाडी येथील कास्टिंग यार्ड वरून आणण्यासाठी डी पी जैन कंपनीचे तीन पीआरओ तसेच सेफ्टी वर्कर, सुरक्षारक्षक यांनी गेली दोन वर्ष मोलाची कामगिरी बजावली आहे.
कोल्हापूर नाक्यावरील अतिक्रमणे…
कोल्हापूर नाक्यावर शाही हॉटेल ते मळाई टावर्स, साई हॉस्पिटल ते माळी हॉटेल, पेट्रोल पंप पर्यंत महामार्ग प्राधिकरणाने संपादित केलेल्या जागेवर असणारी अतिक्रमणे अद्याप काढण्यात आलेली नाहीत. तर दुसरीकडे कोयना पूल पंकज हॉटेल, भंगार दुकान, जाधव आर्केड, समर्थ हॉस्पिटल ते कोल्हापूर नाका या बाजूच्या ठिकाणीही महामार्ग प्राधिकरणाने संपादित केलेल्या जागेवरील अतिक्रमणे अद्याप पूर्णपणे काढण्यात आलेली नाहीत. यामुळे सेवा रस्त्याचे व पुलाच्या भरावाचे काम रखडले आहे.