प्रतिनिधी : देशाचे माजी राष्ट्रपती व महान शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त महात्मा फुले शिक्षण संस्थेत शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने झाली. संस्थेचे संस्थापक माननीय श्री. बाबुराव माने, श्री. दिलीप शिंदे, खजिनदार श्री. प्रमोद माने, इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका सौ. स्वाती होलमुखे, मराठी माध्यमाच्या मुख्याध्यापिका सौ. वीणा दोनवलकर, तसेच उर्दू आणि हिंदी माध्यमाच्या मुख्याध्यापिका सौ. श्रद्धा यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
विद्यार्थ्यांनी नृत्य सादरीकरण करून, भाषणांमधून कृतज्ञता व्यक्त करून, तसेच विविध खेळांचे आयोजन करून शिक्षकांचे मनोरंजन केले. चित्रकला शिक्षक श्री. औटी सर व श्री. विशाल सर यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे मनोहारी चित्र रेखाटून सर्वांचे लक्ष वेधले.
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. शेवटी संस्थेतर्फे सर्व शिक्षकांना भेटवस्तू प्रदान करून त्यांचा सन्मान करण्यात आला.
खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झालेल्या या कार्यक्रमात गुरुजनांबद्दल विद्यार्थ्यांनी व्यक्त केलेली कृतज्ञता आणि संस्थेची शिक्षकांप्रतीची आदरभावना यांचा सुरेख संगम पाहायला मिळाले.