मुबंई : दर्जेदार चित्रपट बघणारा प्रेक्षक वर्ग निर्माण व्हावा. तसेच गाजलेल्या जुन्या चित्रपटाचा आस्वाद सिनेरसिकांना घेता यावा याकरिता आगामी काळात दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या माध्यमातून “फिल्म स्टडी सर्कल” हा अनोखा उपक्रम राबविणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केली. ते गणेशोत्सव निमित्त दादासाहेब फाळके चित्रनगरीतील राजाच्या दर्शनासाठी आले असतांना त्यांनी ही घोषणा केली. चित्रनगरीतील गणेशोत्सवाचे यंदाचे 32 वे वर्ष आहे.
मंत्री ॲड.शेलार म्हणाले, सांस्कृतिक कार्य विभाग व महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ, चित्रकर्मीच्या उन्नतीसाठी सातत्याने विविध योजना, उपक्रम, अभियान राबवित आहे. या उपक्रमामुळे दर्जेदार चित्रपट बघणारा प्रेक्षक वर्ग निर्माण होईलच, मात्र या उपक्रमाच्या माध्यमातून सिनेरसिकांना जुने दर्जेदार मराठी चित्रपट मोठ्या पडद्यावरती बघण्याची पर्वणीच मिळणार आहे.
सह्याद्री वाहिनी आणि महामंडळाच्या संयुक्त विद्यमाने सह्याद्री वाहिनीवर दर्जदार मराठी चित्रपट प्रसारित करण्याचा उपक्रमदेखील सुरू करण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे मराठी सिनेसृष्टीला प्रोत्साहन मिळेल अशी भावना मंत्री ॲड. शेलार यांनी व्यक्त केली.
यावेळी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील, सह व्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर यांच्यासह सुप्रसिद्ध दिग्दर्शक-निर्माता सुभाष घई, अभिनेते मिलिंद दास्ताना, अभिनेत्री रुपाली गांगुली उपस्थित होते