मुंबई : महसूल विभाग हा सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन गरजांसाठी कार्यरत विभाग असून नागरिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी शासनाने 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत ‘सेवा पंधरवडा’ राबविण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
या अभियानात तीन टप्प्यांत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्यात ‘पाणंद रस्तेविषयक मोहीम’, ‘सर्वांसाठी घरे’ला पूरक उपक्रम आणि जिल्हाधिकाऱ्यांमार्फत स्थानिक परिस्थितीचा विचार करून नाविन्यपूर्वक उपक्रम यांचा समावेश आहे.
🔹 पहिला टप्पा – पाणंद रस्ते (17 ते 22 सप्टेंबर)
प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतापर्यंत रस्ता उपलब्ध व्हावा यासाठी शिव पाणंद रस्त्यांचे सर्वेक्षण, नोंदी नसलेल्या रस्त्यांची नोंद, शेतावर जाण्यासाठी रस्ता उपलब्ध करण्यासाठी संमतीपत्र, रस्ता अदालत घेऊन प्रलंबित प्रकरणे निकाली काढणे तसेच रस्त्यांचे सीमांकन व वृक्षलागवड करण्यात येणार आहे. महाराष्ट्र हे प्रत्येक शेताला 12 फूट रुंदीचा रस्ता उपलब्ध करून देणारे पहिले राज्य ठरणार असल्याचे मंत्री बावनकुळे यांनी सांगितले.
🔹 दुसरा टप्पा – सर्वांसाठी घरे (23 ते 27 सप्टेंबर)
राज्यातील प्रत्येक नागरिकाला परवडणारे व सुरक्षित घर मिळावे यासाठी शासन प्रयत्नशील आहे. या टप्प्यात शासकीय जमीन कब्जेहक्काने देणे, अतिक्रमणे नियमानुकूल करणे, विकास आराखड्यातील आरक्षणानुसार बदलाचे प्रस्ताव मांडणे आणि लाभार्थ्यांना जमिनींचे पट्टे वाटप करणे अशी कामे केली जाणार आहेत.
🔹 तिसरा टप्पा – नाविन्यपूर्ण उपक्रम (28 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर)
जिल्हाधिकाऱ्यांमार्फत स्थानिक परिस्थितीचा विचार करून विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जाणार आहेत.
‘सेवा पंधरवडा’मध्ये राबविण्यात येणारे सर्व कार्यक्रम हे मोहिमेपुरते मर्यादित नसून, पुढील काळातही सातत्याने राबवले जातील, असेही महसूल मंत्री बावनकुळे यांनी स्पष्ट केले.