मुंबई (प्रतिनिधी) : आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धारावीला ‘मिनी इंडिया’ म्हटले जाते. विविध राज्यांतून, धर्म-जातीतून आलेल्या लोकांचे वास्तव्य असलेल्या या परिसरात श्री गणेश मित्र मंडळ, मुकुंद नगर हे गेली ५६ वर्षे अखंड एकतेचे प्रतीक ठरत आले आहे.
मंडळाची खासियत म्हणजे येथे गणेशोत्सव अगदी गोसिया मशीदीच्या शेजारी सुरू ठेवण्यात येतो. एवढेच नव्हे तर गेल्या ५५ वर्षांत एकदाही हिंदू-मुस्लिम वादाचा प्रसंग उद्भवलेला नाही. मशीदीत अजाण आणि नमाज निर्विघ्न पार पडतात, तर मंडळात विधिवत पूजा, आरत्या आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम रंगतात. या उत्सवाला हिंदू बांधवांसोबत मुस्लिम बांधवही आवर्जून आरतीसाठी उपस्थित राहतात.
धारावीत १८ पगड जातींचे लोक एकत्र नांदत असले तरी मुस्लिम बांधवांची संख्या लक्षणीय आहे. अशा परिस्थितीत गेल्या पाच दशकांहून अधिक काळ या गौसिया मशीद शेजारी श्री गणेश मित्र मंडळ गणेशोस्तव सण एकोप्याने साजरे केले जात आहेत, हे हिंदू-मुस्लिम ऐक्याचे जिवंत उदाहरण ठरले आहे. श्री गणेश मित्र मंडळाचा हा प्रवास आज केवळ धारावीपुरता मर्यादित नसून सर्व समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे. मंडळाचे अध्यक्ष संदीप तरटे, सचिव सचिन रामुगडे, खजिनदार नरेंद्र काळे तसेच सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या मेहनतीने हा उत्सव आनंदोत्सवात साजरा करत आहेत.
फोटो ओळ : धारावीतील श्री गणेश मित्र मंडळ मंडपामध्ये विराजमान झालेली गणरायाची भव्य मूर्ती.