उंडाळे (प्रतिनिधी) : कराड तालुक्यातील येवती गावामधील जय महाराष्ट्र गणेश विकास मंडळ हे गेल्या ३३ वर्षांपासून ‘एक गाव एक गणपती’ ही संकल्पना राबवणारे एकमेव मंडळ आहे. या मंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व जातीधर्मातील युवक, महिला, आबालवृद्ध एकत्र येऊन गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि ऐक्यभावनेने साजरा करतात.
मंडळ दरवर्षी सामाजिक बांधिलकी जपत शैक्षणिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन करते. विशेष म्हणजे गावकऱ्यांच्या सहकार्यातून या मंडळाने गावात कायमस्वरूपी आकर्षक गणेश मंदिर उभारले असून, दर संकष्टी चतुर्थीला येथे भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी गर्दी करतात.
सध्या मंडळाचे सुमारे ३०० सभासद आहेत. यांपैकी काही पुणे-मुंबईसारख्या ठिकाणी वास्तव्यास असले तरी गणेशोत्सवासाठी ते दरवर्षी आवर्जून गावाला परत येतात आणि सणाचा आनंद सगळ्यांसोबत घेतात.
गेल्या तीन दशकांपासून राबवली जात असलेली ‘एक गाव एक गणपती’ ही संकल्पना इतर गावांतील मंडळांसाठीही प्रेरणादायी ठरावी, असा विश्वास ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
📷 फोटो ओळ : येवती (ता. कराड) येथील जय महाराष्ट्र गणेश विकास मंडळाच्या मंडपामध्ये विराजमान झालेली भव्य गणरायाची मूर्ती.