प्रतिनिधी : ऐरोली येथील नवी मुंबई महानगरपालिकेच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबडेकर स्मारकात गणेशोत्सवापूर्वी नुकतीच नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत विविध पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी, कर्मचारी यांचेकरिता ‘संविधान परिचय कार्यशाळा’ मोठ्या उत्साहात पार पडली.
भारतीय संविधानास 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त संपूर्ण देशभरात ‘संविधान अमृत महोत्सव’ साजरा होत आहे. या अमृत महोत्सवी संविधान पर्वाच्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई संविधान साक्षर होण्याच्या दृष्टीने ‘घर घर संविधान’ अभियानांतर्गत वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहे.
या अंतर्गत महानगरपालिका अधिकारी, कर्मचारीवृंदासाठी परिमंडळ व विभाग कार्यालयनिहाय संविधान परिचय कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले होते. त्याचाच पुढचा टप्पा म्हणजे नवी मुंबई पोलिस आयुक्तालयांतर्गत असलेल्या विविध पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी व अधिकारी यांच्याकरिता पोलीस आयुक्त श्री.मिलिंद भारंबे यांच्या मान्यतेनुसार संविधान परिचय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी माजी निवडणूक आयुक्त जे.एस.सहारीया यांनी उपस्थित पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना संविधानातील मूल्ये, नागरिकांचे हक्क व कर्तव्य तसेच कायद्याची अंमलबजावणी करताना पोलीस दलाची भूमिका या विषयावर अभ्यासपूर्ण माहिती देत संविधानाचे महत्व विषद केले.
या शिबिरापूर्वी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामधील बेलापूर ते दिघा विभागातील साधारणत: 800 महिला बचत गटांतील सदस्यांसाठी विभागनिहाय संविधान परिचय कार्यशाळांचे आयोजन करून संविधान साक्षर करण्यात आले. समाजातील विविध घटकांपर्यंत संविधानाचे महत्व आणि माहिती पोहचवून नवी मुंबई हे संविधान साक्षर शहर करण्याच्या संकल्पपूर्तीसाठी या कार्यशाळांचे ठिकठिकाणी आयोजन केले जात आहे.