मुंबई : मराठा आरक्षणाबाबत जरांगे पाटील यांनी दिलेल्या प्रस्तावावर उपसमितीने सकारात्मक चर्चा केली असून, यासंदर्भात कायदेशीर मार्गदर्शन घेत आहोत, अशी माहिती जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. “सरकारला प्रश्न सोडवायचा आहे. मात्र महाविकास आघाडीचे नेते केवळ राजकीय पोळी भाजण्यासाठी वेगवेगळे पवित्रे घेत आहेत,” अशी टीकाही त्यांनी केली.
मंत्री विखे पाटील यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीस मंत्री गिरीष महाजन, दादा भुसे, मकरंद पाटील, शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह अन्य मंत्री दूरदृष्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. विधी व न्याय विभागाचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.
बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना विखे पाटील म्हणाले की, हैद्राबाद आणि सातारा गॅजेटिअर संदर्भात विस्ताराने चर्चा झाली असून, अंमलबजावणी करताना कायदेशीर अडचणी टाळण्यासाठी अॅडव्होकेट जनरल यांच्याशी चर्चा होणार आहे. “जरांगे पाटील यांना भेटायला कोण जावे यावर आक्षेप घेण्याचे काही कारण नाही. मात्र फक्त राजकारण करण्यासाठी येणाऱ्यांनी समाजासमोर आपली भूमिका स्पष्ट करावी,” असे ते म्हणाले.
माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी “घटनेत बदल करून आरक्षणाचा प्रश्न सोडवावा” असे सुचविलेल्या वक्तव्यावर विखे पाटील यांनी टीका केली. “पवार साहेब चार वेळा मुख्यमंत्री आणि दहा वर्षे केंद्रात मंत्री असताना हा प्रश्न का सोडवला नाही? मंडल आयोग स्थापन होताना मराठा समाजाचा समावेश करण्याची सूचना त्यांनी का केली नाही? आता ज्ञानदान करू नये,” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.