मेढा (अजित जगताप) : शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो पिईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. असे घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नमूद केले होते. छत्रपती शिवरायांच्या विचारानुसार जावळी तालुक्यातही रयतेला हक्क मिळवून देण्याचे काम झाले आहे. गरीब कातकरी समाजातील विद्यार्थिनीची शिकण्याची इच्छा शिक्षण विस्तार अधिकारी तथा गुरुवर्य रघुनाथ दळवी साहेब यांच्यामुळे पूर्ण झाले आहे. खऱ्या अर्थाने गुरु शिष्याचे कर्तव्य पार पाडल्याचेच भाग्य लाभले आहे.
बाबत माहिती अशी की, गरिबीची जाणीव असलेल्या जावळी तालुक्यातील म्हातेखर्द येथील श्री रघुनाथ दळवी साहेब यांनी आपले शिक्षण पूर्ण करताना अनेक गरिबीचे चटके सहन केले. आपल्यासारखे हजारो विद्यार्थी गरिबीमुळे शिक्षण घेऊ शकत नाही. त्यांना मोलमजुरी करूनच पुढील आयुष्य जगावे लागते. त्यातच कातकरी समाज म्हणजे खऱ्या अर्थाने निसर्गावर अवलंबून असणारे आदिवासी आहेत. दररोज मासेमारी व खेकडे पकडूनच उदरनिर्वाह करतात. त्यांच्या जीवनामध्ये प्रकाश निर्माण करण्यासाठी शिक्षण विस्तार अधिकारी रघुनाथ दळवी साहेब यांनी कातकरी समाजातील वंदना मुकणे यांची शिकण्याची धडपड पाहिली. आसनी तळ येथील सातारा जिल्हा परिषद या प्राथमिक शाळेमध्ये शिक्षणाचे धडे घेणाऱ्या वंदना मुकणे यांना संपूर्ण सहकार्य करून गुरुवर्य दळवी साहेबांनी खऱ्या अर्थाने एक रोपटे लावले. शिक्षिका म्हणून कातकरी समाजातील वंदना मुखणे आज मोठ्या जिद्दीने कोकणा तील महाड येथे शिक्षिका म्हणून काम करत आहेत.
जावळी तालुक्यातील शांत व संयमी शिक्षण विस्तार अधिकारी गुरुवर्य रघुनाथ दळवी साहेब यांच्या परिस्पर्शाने अक्षरशा लोखंडाचे सोने झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. गुरुवर्य रघुनाथ दळवी साहेब यांच्या सेवानिवृत्तीच्या सत्कार निमित्त त्यांनी केलेल्या महान कार्याची आठवण यानिमित्त सर्वांना झाली. विशेष म्हणजे या आनंदी सोहळ्याला उपशिक्षिका असलेल्या वंदना मुकणे यांची उपस्थिती अनेकांच्या डोळ्यातला आनंद अश्रू आणत होते. गुरुवर्य रघुनाथ दळवी साहेबांच्या आयुष्यातील दोन व्यक्ती म्हणजे खऱ्या अर्थाने परिवर्तन घडवणाऱ्या व्यक्ती आहेत. त्यापैकी एक त्यांचे बाळूमामा आणि दुसऱ्या म्हणजे वंदना मुकणे यांचे नाव सर्वांच्या मुखांमध्ये अभिमानाने घेतले जात आहे.
_____________________________
चौकट — या ऐतिहासिक व भावनिक कार्यक्रमाला जावळीचे माजी आमदार सदाशिव सपकाळ धरणग्रस्त नेते वसंतराव मानकुमरे ,जिल्हा बँक संचालक ज्ञानेश्वर रांजणे, शिक्षक नेते सिद्धेश्वर पुस्तके, बळवंत पाटील ,विष्णू खताळ, सुरेश गायकवाड ,मच्छिंद्र मुळीक, हंबीरराव जगताप, डॉक्टर संपतराव कांबळे, लकडे गुरुजी, अगुंडे गुरुजी, महेंद्र जानुगडे, नारायण शिंगटे, दत्ता पवार- मर्ढेकर , किसन चिकणे, वैशाली कांबळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
_____________________________
फोटो कातकरी विद्यार्थिनी शिक्षिका बनवणाऱ्या गुरुवर्यांचा सत्कार सोहळा (छाया– अजित जगताप ,मेढा)