मनोज जरांगे पाटील गेली तीन दिवस अन्न-पाणी विना उपोषण करत आहेत. मराठा समाजाच्या न्याय्य मागणीसाठी त्यांनी स्वतःला झोकून दिले आहे. हा केवळ एका व्यक्तीचा नव्हे तर गरजवंतांचा लढा आहे.
आज सकाळपासून मी या आंदोलनाच्या ठिकाणी आहे. दिवसभर समाजातील प्रत्येक घटकाची एकजूट, त्यांचे योगदान आणि त्यांचा जीव ओतून दिलेला सहभाग जवळून पाहिला.
🔹 कोणी मोफत अन्नदान करत आहे, कोणी पाण्याचे वाटप करत आहे.
🔹 कोणी औषधांसाठी मेडिकल कॅम्प लावला आहे, तर कोणी लोकांचा उत्साह वाढवण्यासाठी हलगी-ढोल वाजवत आहे.
🔹 संत परंपरेला जागून हरिभक्त पारायण, कीर्तनातून जनजागृती होत आहे.
प्रत्येकजण आपापल्या परीने समाजाच्या पाठीशी उभा आहे. या उत्साहात घरी जाण्याची इच्छा होत नाही – रोजचं काम, रोजची घरची ओढ आज मागे पडली आहे. मन ओढलं जातंय ते या लेकरा-बाळांच्या भविष्याकडे.
गावोगावाहून आलेले बांधव आपली लेकरं, आपली कुटुंबं घरात सोडून या चळवळीत उभे आहेत. हे साधं काम नाही – यासाठी बापाचं, पालकाचं काळीज लागतं.
आज लाखोंच्या संख्येने मराठा समाज आझाद मैदानात दाखल झाला आहे. एकमेकांना विचारलं जातं – “पाणी हवं का?”, “खायला हवं का?”, “नाश्ता केला का?” – इतकी परस्पर काळजी आणि जिव्हाळा कुठे दिसतो?
मागणी स्पष्ट – एकच आवाज
मनोज जरांगे यांचा एकच निर्धार आहे –
सकल मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळालं पाहिजे!
ही मागणी कुणाच्या वैयक्तिक स्वार्थासाठी नाही, तर शिक्षण, नोकरी आणि जगण्यासाठीच्या मूलभूत हक्कांसाठी आहे.
आज शेतीला हमीभाव नाही, अवकाळी पावसाने शेतकरी उद्ध्वस्त आहेत. पूरक व्यवसाय चालत नाहीत. अशा परिस्थितीत मुला-बाळांना चांगले शिक्षण आणि रोजगार मिळावा म्हणून हा समाज सरकारसमोर उभा आहे.
परंपरेचा वारसा – आशेची ज्योत
हा लढा नवा नाही.
🔸 अण्णासाहेब पाटलांनी आवाज दिला होता.
🔸 आज तोच आवाज मनोज दादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली ताकदीने घुमतो आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा वारसा जपणारा हा समाज बिकट असला तरी तिखट आहे.
गणरायाच्या चरणी प्रार्थना
🙏 या आंदोलनाला यश मिळो,
🙏 सरकारला सद्बुद्धी येवो,
🙏 मराठा समाजाला हक्काचं सरसकट ओबीसी आरक्षण मिळो!
🚩 एक मराठा – लाख मराठा! 🚩