नवी मुंबईतील गणेशोत्सव पर्यावरणपूरक पध्दतीने साजरा व्हावा याकरिता नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने दीड महिना आधीपासूनच जनजागृतीला सुरूवात करण्यात आलेली असून आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी केलेल्या आवाहनास नागरिकांकडून चांगला सहभाग लाभताना दिसत आहे. यामध्ये शाडूच्या मातीच्या श्रीमूर्तींची प्रतिष्ठापना करून तसेच सजावटीत पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करून नागरिकांनी पर्यावरणाविषयी जागरूकता प्रदर्शित केलेली आहे. अशा नागरिकांना पर्यावरणमित्र म्हणून महापालिका आयुक्त यांच्या स्वाक्षरीचे अभिनंदन व सन्मानपत्र विसर्जनस्थळी प्रदान करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे मा.न्यायालयाच्या आदेशानुसार तसेच महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार 6 फूटांपर्यंतच्या श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन 143 इतक्या मोठ्या संख्येने सर्व विभागांत बनविलेल्या कृत्रिम तलावांमध्ये करण्यावर भर दिला जात आहे. या माध्यमातून जलस्त्रोतांचे संरक्षण करण्याकडे लक्ष दिले जात आहे.
याशिवाय आणखी एक महत्वाची बाब म्हणजे सर्व 22 नैसर्गिक आणि 143 कृत्रिम तलावांच्या ठिकाणी हार, फुले असे ओले निर्माल्य आणि सजावटीच्या साहित्यातील कंठी, माळा असे सुके निर्माल्य वेगळे ठेवण्यासाठी स्वतंत्र निर्माल्य कलशांची व्यवस्था करण्यात आलेली आहे व ते तुर्भे येथील प्रकल्पस्थळी घेऊन जाण्यासाठी स्वतंत्र वाहन व्यवस्था करण्यात आलेली आहे. या ओल्या निर्माल्याचे खतात रूपांतर केले जाणार आह या पर्यावरणहिताय उपक्रमात काही स्वयंसेवी संस्था पुढाकार घेत सक्रिय सहभागी झालेल्या आहेत. डॉ.श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने कोपरखैरणे सेक्टर 19 येथील धारण तलाव, महापे तलाव आणि सेक्टर ९ विस्तारित तलाव येथे गणेश विसर्जनादरम्यान निर्माल्य गोळा केले जात असून त्यांच्या पाकळ्या सुट्या करून त्याचे सेंद्रिय कंपोस्टमध्ये रूपांतर केले जात आहे. दीड दिवसाच्या विसर्जनप्रसंगी या 3 विसर्जन स्थळांवरून 534 किलो फुलांचे निर्माल्य संकलित करण्यात आले असून त्यापासून पाकळ्या सुट्या करून त्यापासून निर्माण होणारे खत परिसरातील हिरवाई फुलविण्यासाठी उपयोगात आणले जाणार असून बाप्पावरील श्रध्दा आणि निसर्गाची जपणूक यांची सांगड घातली जात आहे.