मुंबई – ओबीसीतून मराठा आरक्षणाची मागणी करत मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हजारो मराठा बांधव आज सकाळपासून आझाद मैदानावर दाखल झाले. मैदान तुडुंब भरले असून, सीएसएमटीसह कुलाबा ते दादरपर्यंत वाहतूक ठप्प झाली. आंदोलकांनी टेम्पोतून धान्य, भाजीपाला, गॅससिलिंडर आणून सामूहिक स्वयंपाक व मुक्कामाची व्यवस्था केली आहे. महिनाभर नव्हे तर दोन महिने थांबण्याची तयारी आंदोलकांनी केली असून, “आरक्षण मिळाल्याशिवाय मागे फिरायचे नाही” असा निर्धार व्यक्त केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “कायदेशीर मार्गानेच समाधान शोधू” असे सांगत समितीमार्फत चर्चेला सुरुवात केली. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ओबीसीतून मराठा आरक्षण मिळणार नसल्याचे स्पष्ट केले. उद्धव ठाकरे यांनी सरकारवर टीका केली, तर अजित पवार यांनी संध्याकाळपर्यंत मौन पाळले.
संध्याकाळी पत्रकार परिषदेत जरांगे पाटील म्हणाले, “आंदोलनाला परवानगी न देण्याचा खेळ सुरू आहे. सरकारने दोन दिवसांत निर्णय घेतला नाही तर मी पाणीही सोडणार आहे. मराठ्यांना छळ करून मुंबई सोडण्यास भाग पाडले जात आहे, पण आम्ही शांततेतच लढणार.” आझाद मैदान घोषणांनी दुमदुमले असून, मराठा समाजाचा लढा निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे.