प्रतिनिधी : शासनाने आदेश देवूनही रात्र शाळा, ज्युनिअर कॉलेजमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे ऑगस्ट पेड इन सप्टेंबर महिन्याचे पगार झाले नाहीत. त्यामुळे शुक्रवार दिनांक 29 ऑगस्ट 2025 रोजी शिक्षक भारती संघटनेच्या शिष्टमंडळाने शिक्षण उपसंचालक यांची भेट घेऊन पगार विलंबाबाबत नाराजी व्यक्त केली. तसेच 9 सप्टेंबर 2025 पर्यंत पगार न झाल्यास शिक्षक भारती संघटना शिक्षण उपसंचालक कार्यालयात ठिय्या आंदोलन करणार असा इशारा शिक्षक भारती संघटनेचे कार्याध्यक्ष सुभाष सावित्री किसन मोरे यांनी दिला आहे.
गणपती सणापूर्वी सर्व राज्य शासकीय कर्मचारी,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना पगार अदा करण्याच्या शासनाने सूचना दिल्या होत्या. परंतु रात्र शाळा व ज्युनिअर कॉलेजचे जुलै पेड इन ऑगस्ट महिन्याचे पगार अद्याप जमा न केल्याने ऑगस्ट महिन्याची पगार बिले उत्तर,दक्षिण व पश्चिम विभाग वेतन अधीक्षक कार्यालयात विनाकारण नाकारली जात आहेत. ही अत्यंत चुकीची बाब आहे. यविरोधात शिक्षक भारती संघटनेने तीव्र निषेध व्यक्त करत पगार बिल जमा करून तातडीने वेतन करण्याची मागणी केली आहे. बेकायदेशीरपणे पगार रोखल्याने आंदोलनात मोठ्या संख्येने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी व्हावे असे आवाहन सुभाष मोरे यांनी केले आहे. याप्रसंगी शरद गिरमकर, ईश्वर आव्हाड, अशोक शिंदे, राधिका महांकाळ, अकबर खान, भगवान बडगुजर, मदन दुबे, रवी कांबळे, गवरे सर, भामरे सर, पाखरे सर आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.