मुंबई : धारावीतील काळा किल्ला परिसरातील श्री हनुमान सेवा मंडळ (धारावीचा कालेश्वर म्हणून परिचित) यावर्षी आपल्या ६३ व्या वर्षात पदार्पण करत असून, गणेशोत्सवाच्या निमित्ताने सामाजिक भान जागृत करणारा संदेश देत आहे.
यंदा मंडळाने “एका त्रस्त धारावीकराची व्यथा” या टॅगलाईनखाली धारावीतील पुनर्वसन आणि हक्काच्या घराचा प्रश्न मांडला आहे. गेल्या अनेक दशकांपासून धारावीकर आपापल्या हक्काच्या घरासाठी झगडत आहेत, त्याला न्याय मिळावा हा संदेश देखाव्यातून प्रभावीपणे सादर करण्यात आला आहे. या विषयाला गणेश भक्तांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
मंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे ते दरवर्षी पर्यावरणपूरक गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करतात. यंदाही परळ येथील मूर्तिकार पराग पारधी यांनी बनवलेली कागदी लगद्याची मूर्ती मंडळाने प्रतिष्ठापित केली आहे.
यापूर्वी मंडळाने मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळावा या विषयावर देखावा सादर केला होता, त्यानंतर केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारच्या शिफारसीला मंजुरी देत मराठीला राजभाषेचा दर्जा दिला होता. यावरून मंडळाने दिलेल्या संदेशांचा प्रभाव समाजात उमटतो हे स्पष्ट झाले होते. या वर्षीही मंडळाची अपेक्षा आहे की, “धारावीतील जनतेला त्यांच्या हक्काची घरे धारावीतच मिळावीत” हा संदेश गणपती बाप्पा नक्कीच पूर्ण करतील. या संदेशाची निर्मिती व दिग्दर्शन गणेश चंद्रकांत खाडे यांनी केले असून, मंडळाचे प्रशांत खरात – अध्यक्ष,नाना आगवणे – कार्याध्यक्ष, प्रमोद खाडे – सचिव, सोमनाथ आगवणे – खजिनदार, प्रणव कांबळे तसेच सर्व उत्सव समिती यांनी अथक परिश्रम घेऊन हा उपक्रम यशस्वी केला आहे.