पुणे: अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात विशेष न्यायालयानं निकाल दिला आहे. पाचपैकी दोन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सचिन अंदुरे, शरद कळसकर यांना न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. आरोपी विरेंद्र तावडे, ऍड संजीव पुनाळेकर, विक्रम भावे यांची न्यायालयानं पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली आहे. दाभोलकर यांची २०१३ मध्ये पुण्यात हत्या झाली होती. त्यांच्या हत्येला पावणे अकरा वर्ष उलटली आहेत.
२० ऑगस्ट २०१३ रोजी अंनिसचे कार्याध्यक्ष नरेंद्र दाभोलकरांची पुण्यात दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. ओमकारेश्वर पुलावर त्यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात एकूण पाच आरोपी होते. सचिन अंदुरे, शरद कळसकर या दोघांनी दाभोलकरांवर गोळ्या झाडल्या होत्या. दोन्ही हल्लेखोरांना न्यायालयानं दोषी धरलं आहे. त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
डॉ. विरेंद्र तावडे, ऍड संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या तिघांवर दाभोलकरांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप होता. पण त्यांची न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली आहे. त्यांच्या विरोधात पुरावे नसल्याचं न्यायालयानं निकाल देताना म्हटलं. त्यामुळे दाभोलकर हत्या प्रकरणात हल्लेखोरांना शिक्षा झाली आहे. पण कट रचल्याचा आरोप असणाऱ्या तिघांची सुटका झाली आहे.
दाभोलकरांच्या हत्येला नऊ वर्षे उलटल्यानंतर १५ सप्टेंबर २०२१ रोजी पुण्याच्या विशेष न्यायालयानं डॉ. विरेंद्र तावडे, शरद कळसकर, सचिन अंदुरे, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या पाच आरोपींवर आरोप निश्चित केले. या पाचही आरोपींनी गुन्हा कबूल करण्यास नकार दिला. त्यामुळे विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरू झाली. न्यायाधीश नावंदर यांच्या बदलीनंतर विशेष न्यायाधीश पी. पी. जाधव यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरू झाली.
या खटल्यात ‘सीबीआय’तर्फे विशेष सरकारी वकील प्रकाश सूर्यवंशी यांनी २० साक्षीदारांची साक्ष नोंदवली. तर बचाव पक्षातर्फे अॅड. प्रकाश साळशिंगीकर, अॅड. वीरेंद्र इचलकरंजीकर आणि अॅड. सुवर्णा आव्हाड यांनी दोन साक्षीदारांची साक्ष नोंदवत सरकार पक्षाच्या साक्षीदारांची उलटतपासणी नोंदवली.
डॉ नरेंद्र दाभोलकर खून खटला घटनाक्रम
* २० ऑगस्ट २०१३ : महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या.
* पुणे पोलिसांकडून चौकशीला सुरुवात
* मे २०१४ : पुणे पोलिसांकडून सीबीआयकडे तपासाची सूत्रे
* जून २०१६ : सीबीआयकडून दोन वर्षांनी पहिला आरोपी डॉ. वीरेंद्रसिंह तावडेला पनवेलमधून अटक.
* सप्टेंबर २०१६ : डॉ. वीरेंद्रसिंह तावडेवर हत्या आणि हत्येचं षडयंत्र रचल्याप्रकरणी आरोपपत्र दाखल
* ऑगस्ट २०१८ : महाराष्ट्र एटीएस कडून वैभव राऊत आणि शरद कळसकर याला अटक.
* मे २०१९ ;व्यवसायाने वकील असलेले संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावेला डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणी सीबीआयकडून अटक; पुनाळेकर आणि विक्रम भावेची न्यायालयाकडून जामीनावर मुक्तता
* सप्टेंबर २०१९ : दाभोलकर हत्याप्रकरणी आरोपी म्हणून दाखविलेल्या सनातन संस्थेशी संबंधित सारंग आकोलकर आणि विनय पवार यांची नावे दोषारोपपत्रातून वगळली
* सप्टेंबर २०२१ : पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाने दाभोलकर हत्या प्रकरणी अटक कलेले डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद काळस्कर, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांच्याविरोधात दोषारोप निश्चित.
* आठ वर्षांनी २०२१ मध्ये सीबीआयने अटक केलेल्या आरोपींविरोधात खटला सुरू
* १० मे २०१४ सुमारे ११ वर्षांनी डॉ. दाभोलकर खटल्याचा निकाल