कोपरखैरणे : वैचारिक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी नेहमीच अधीर असलेल्या गणेशभक्तांनी यंदाही एक वेगळा उपक्रम अनुभवला. सार्वजनिक गणपती उत्सव मंडळापासून ते घरगुती गणेशोत्सवापर्यंत समाज, राष्ट्र आणि संस्कृती संवर्धनाचे संदेश देत सातत्याने उपक्रम राबवणारे प्रा. रवींद्र पाटील यांच्या घरच्या बाप्पासमोर यंदा अठराव्या वर्षीही पहिल्या दिवशी जाहीर काव्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले.
या संमेलनात पंधरा कवींच्या कविता वाचन व सादरीकरणाने कार्यक्रमाला विशेष रंगत आली. प्रा. शंकर गोपाळे यांनी सलग अठरा वर्षे सांभाळलेली सूत्रसंचालनाची धुरा यंदाही पार पाडत ‘कविता डॉट कॉम’ तर्फे घरगुती व सार्वजनिक उत्सवांबद्दल माहिती देत स्वतःची कविता सादर करून रसिकांची दाद मिळवली. प्रा. नाना पाटील, सौ. संगीता काळभोर, सौ. स्वाती शिवशरण, सौ. माधवी मोतलिंग, रुद्राक्ष पातारे, अंकिता गोळे, नेहा माळी, मनस्वी सूर्यवंशी, परिषा शिवशरण आणि छोटा गायक अवनीश पाटील यांच्या कवितांनी संमेलनाला अधिक रंगत आणली. तर युवा वकील सागर कोल्हे, हर्षल पाटील, सौ. मनीषा पाटील, सौ. जिज्ञासा पाटील आणि हर्षल देशमुख यांनी कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला.
आयोजक प्रा. रवींद्र पाटील यांनी सौ. चंदना गोस्वामी यांची “प्रत्येकास हमखास भेटतो…” ही छत्रपती शिवाजी महाराजांवरील कविता सादर करून कार्यक्रमामागील उद्देश स्पष्ट केला. यावर्षीच्या देखाव्यात युनेस्कोने छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा किल्ल्यांना दिलेल्या जागतिक दर्जाची पार्श्वभूमी उलगडली. “महाराष्ट्रात जन्माला आलो आहोत तर चार धाम, अष्टविनायक, बारावे ज्योतिर्लिंगासह छत्रपतींच्या किमान बारा किल्ल्यांचे दर्शन घ्यायलाच हवे” असा संदेश त्यांनी दिला.
कार्यक्रमाची सांगता गणरायाच्या आरतीने व महाप्रसादाने झाली. काव्यानंद व सांस्कृतिक संदेश यांचा संगम घडवणारा हा उपक्रम उपस्थितांच्या मनात घर करून गेला.