मुंबई(रमेश औताडे) : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आझाद मैदानातील आंदोलनाला खासदार प्रकाश सोळंके आणि आमदार क्षीरसागर यांनी आंदोलन स्थळी येऊन आंदोलकांची भेट घेतली. या भेटीनंतर आंदोलनकर्त्यांचा उत्साह अधिकच वाढला.
आंदोलनकर्त्यांची संख्या आता पाच हजारांच्या वर गेल्याने आझाद मैदान परिसरात गर्दीचे चित्र पाहायला मिळाले. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात ‘जाणता राजा’ शैलीत झेंडे फडकावून आंदोलनकर्त्यांनी आपला उत्साह व्यक्त केला. इतकेच नव्हे, तर सीएसएमटी परिसरातील सेल्फी पॉईंटवरील शोभिवंत कारंज्यात काही आंदोलक अंघोळ करताना दिसले.
वाहतुकीवरही आंदोलनाचा परिणाम झाला असून जेजे उड्डाणपूल फक्त आंदोलनकर्त्यांच्या वाहनांसाठी खुला ठेवण्यात आला आहे. जालन्यावरून आलेल्या कार्यकर्त्यांनी टेम्पोमध्येच मसाले भात बनवून स्वयंपाकाची व्यवस्था सुरू केली आहे.
आंदोलनामुळे खाऊ गल्ल्यांमध्ये होणारी गर्दी टाळण्यासाठी त्या बंद करण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न सुरू असल्याचे आमदार रोहित पवार यांनी सांगितले.