मुंबई(रमेश औताडे) : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील शुक्रवारी सकाळी आझाद मैदानात दाखल झाले. त्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण परिसर घोषणाबाजी, हालगीच्या ठेक्यांवरील नाच-गाणे आणि उत्साहाने दुमदुमून गेला.
सकाळपासूनच मुंबई व उपनगरातील रेल्वे, एस.टी., खासगी वाहनं, टेम्पो आणि बसने हजारो आंदोलनकर्ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस व आझाद मैदानाकडे दाखल झाले. अनेकांनी बेस्ट बसच्या छतावर चढून घोषणाबाजी करत जल्लोष केला. काही ठिकाणी वृद्धांसकट तरुण मंडळी हालगीच्या ठेक्यावर नाचत आझाद मैदानात दाखल झाली.
आझाद मैदान परिसरात पावसामुळे चिखल-माती साचल्याने आंदोलनकर्त्यांना अडचणी येत असल्या तरी उत्साहात कोणतीही कमी दिसली नाही.
मोठ्या संख्येने जमलेल्या गर्दीला आळा बसावा म्हणून मुंबई पोलिसांनी मैदान परिसरात मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. सीएसएमटीपासून आझाद मैदानापर्यंत पोलिसांनी रस्त्यांवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था उभारली आहे.
याच आझाद मैदानाने यापूर्वी अण्णा हजारे, मेधा पाटकर, तसेच अनेक मोठ्या समाज नेत्यांच्या आंदोलनाने आझाद मैदान गरजले होते. आता त्याच मैदानावर मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन मराठा आरक्षणासाठी गरजनार आहे.
ट्रॅक्टर घेऊन या परीसरात आंदोलनकर्ते आले होते. बृहन्मुंबई महानगरपालिके जवळील परिसर वाहतूक पूर्ण बंद केली होती. रस्त्यावर एकच गर्दी झाली होती. आझाद मैदानात चिखल झाला होता तरीही आंदोलनकर्त्यांचा उत्साह कमी होत न्हवता. पावसाचा जोर जसा वाढत होता तसे आंदोलनकर्ते आक्रमक होत घोषणा देत आरक्षण मागत होते.
छत्र्या , भगवे झेंडे, बॅनर, गावावरून आलेले ट्रॅक व त्यात जेवणाचे साहित्य, व हजारो आंदोलनकर्ते भर पावसात घोषणा देत होते.पालिकेच्या समोर सेल्फी पॉईंट येथे आंदोलनकर्ते घोषणा देत होते. आरक्षणासाठी आमच्या बांधवांच्या आत्महत्या झाल्या आहेत. त्यामुळे आता आम्ही मैदान सोडणार नाही.