Friday, August 29, 2025
घरआरोग्यविषयकमुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष : गरीबांच्या आशेचा किरण chif...

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष : गरीबांच्या आशेचा किरण chif minister relief fund (cmrf)

“आमच्याकडे पैसा नव्हता, डॉक्टरांनी शस्त्रक्रियेचा खर्च पाच लाख सांगितला… आता काय करायचं?” – अशी हतबल अवस्था असंख्य कुटुंबांची असते. पण अशावेळी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचा फोन येतो आणि शब्द ऐकू येतात – “आपल्या उपचारासाठी शासनाकडून निधी मंजूर झाला आहे.”
क्षणभरात डोळ्यांत पाणी तरळते… कारण हे फक्त पैसे नसतात, तर एखाद्याच्या जीवाला मिळालेला नवा श्वास असतो.

गरीब आणि गरजूंना महागड्या उपचारांसाठी मदत मिळावी म्हणून राज्य सरकारने मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष ( #chif minister relief fund )सुरू केला. “आरोग्य हाच खरा धनसंचय” हे तत्व मानणारा हा उपक्रम गेली अनेक वर्षे हजारो रुग्णांना जीवनदान देत आहे.

मुळात “मुख्यमंत्री सहाय्यता निधी ट्रस्टची स्थापना सन 1967 साली तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झाली. मुख्यमंत्री यांच्या स्वेच्छाधिकारात नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त वेगवेगळ्या प्रकारच्या कारणानी पिडीत असलेल्या व्यक्तीना उपचारासाठी अर्थ सहाय्य पुरवले जावे.हा या ट्रस्टचे उदिष्ट्ये राहिले आहे.मात्र कालांतराने त्याचा अधिक विस्तार होत गेला. नोव्हेंबर 2001 मध्ये शासन निर्णयात थोडा बदल करून शैक्षणिक व वैद्यकीय संस्थाच्या इमारतीच्या बांधकामासाठी आर्थिक मदत आणि अपंग व्यक्तींच्या संस्थांना आर्थिक मदत,हे ट्रस्टच्या ध्येय आणि उदिष्ट्येमध्ये समावेश करण्यात आले.

सन 2015 मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात सरकार आले.तेव्हा मात्र त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी ट्रस्टकडे अत्यंत गांभीर्याने लक्ष देवून हा उपक्रम सर्वसामान्य जनतेसाठी उपकृत केले. या ट्रस्टच्या अंतर्गत यासाठी त्यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाची स्थापना केली. आपल्या वैद्यकीय निधीचा गोरगरीब आणि गरजू लोकांना तातडीने विना अडथळा वैद्यकीय सहाय्यता निधी मिळण्यासाठी या वैद्यकीय कक्षासाठी तज्ज्ञची कार्यकारिणी समिती स्थापन करून त्यांना अंमलबजावणीचे अधिकार दिले. या समितीमध्ये रुग्णालय अधिक्षक,प्रशासकीय अधिकारी,धर्मादाय आयुक्तालयाचे अधिकारी,आरोग्य सल्लागार यांचा समावेश करण्यात आला.

आता तर राज्यातील गरजू रुग्णांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा अर्ज घेवून मुंबईपर्यत येण्याची गरज भासणार नाही. कारण काही महिन्यापूर्वीच आर्थिकदृष्ट्या गरजू रुग्णांना तातडीने आर्थिक मदत मिळण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली व या वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांच्या देखरेखीखाली राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष आणि धर्मादाय रुग्णालयात मदत केंद्र सुरू करण्यात आले आहे. या जिल्हा कक्षातून अनेक दुर्धर आजारावरील उपचारांसाठी येणाऱ्या खर्चाकरिता मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत करणे,धर्मादाय रुग्णालयाअंतर्गत मोफत उपचार मिळवून देणे,महात्मा फुले जनआरोग्य योजना,आयुष्यमान भारत योजनेसह इतर योजनांची माहिती व सुविधा रुग्णांना देणे,हे मुख्य उदिष्ट्ये या जिल्हास्तरीय कक्षाचे राहणार आहे.

राज्यातील 36 जिल्ह्यात मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचे कार्य गतीने सुरू आहे.कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक हे स्वतःहा दररोज याचा आढावा घेतात.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दैनंदिन उपचार आणि निधी यांचे अवलोकन करीत असतात. वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या अंमलबजावणी समितीचा आढावा घेत असतात.

दिनांक 01जानेवारी ते 31 जुलै 2025 या सात महिन्याच्या कालावधीत राज्यातील 19 हजार.540 रुग्णांना 170 कोटी 51 लाख,13हजार रुपयांचा निधी अर्थ सहाय्य म्हणून वितरित करून सरकारने मोठे सतकार्य केले आहे.या कक्षाचे प्रमुख श्री.नाईक यांना कधी ही रात्री बेरात्री फोन करा तुम्हाला तात्काळ आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांची धडपड सुरू असते.त्यांना आरोग्य सेवेचा दांडगा अनुभव आहे.यापूर्वी त्यांनी जळगांव जिल्ह्यात आरोग्य महाशिबीराच्या माध्यमातून अनेक वेळा जनसेवा केली आहे.अनेकांना नवीन दृष्टीने दिली आहे. महा रक्तदान शिबीर आयोजित केले आहे. यांची नोंद सरकारने घेतली.म्हणूनच अत्यंत महत्वाची आणि सामाजिक दायित्व म्हणून मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख पद त्यांच्याकडे सोपविण्यात आले.

मुख्यमंत्री आर्थिक सहाय्यता निधी कक्ष हा देशातील पहिला असा निधी कक्ष आहे की, याला एफसीआरए (FCRA) प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.यामुळे विदेशातून निधी मिळविणे शक्य झाले आहे.. मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी औद्योगिक सामाजिक दायित्व निधी (सीआरएस फंड) मिळविण्यासाठी एक वेगळी समन्वयक टीम मुख्यमंत्री कार्यालयात काम करीत असते., कर्करोग, हृदयरोग, यकृत-मूत्रपिंड प्रत्यारोपण अशा एकूण विविध. वीस आजारांवर अर्थ सहाय्य दिले जाते. यामध्ये अपघातग्रस्त रुग्णांचा सुद्धा समावेश आहे.यासाठी पात्र रुग्ण आपण वास्तव्यास असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत अर्ज करू शकतात. यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे (आधारकार्ड,पॅन कार्ड,रहिवासी दाखला,बँक खाते क्रमांक,रेशन कार्ड, वैद्यकीय अंदाजपत्रक, डॉक्टरांचे प्रमाणपत्र, तहसीलदार यांचा वार्षिक उत्पन्न दाखला 1.60 लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेला, इ.) तपासून झाल्यावर प्रकरण मुंबईतील कक्षाकडे पाठवले जाते. मंजुरी मिळताच निधी दोन -तीन दिवसात थेट रुग्णालयाच्या खात्यात जमा होतो.

पारदर्शकता आणि गती
पूर्वी अशा मदतीसाठी कागदोपत्री प्रक्रिया लांबणारी होती. मात्र आता ऑनलाइन अर्ज व जिल्हानिहाय समन्वयक नियुक्त झाल्याने गती वाढली आहे. आपत्कालीन परिस्थितीत प्राधान्याने निर्णय होतो. त्यामुळे अनेक रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी शेवटच्या क्षणीही मदत मिळाली आहे.यासाठी खालील संकेतस्थळाचे संपूर्ण माहिती व अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.

आशेचा खाली किरण

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष म्हणजे केवळ आर्थिक मदत नव्हे, तर “शासन आपल्या सोबत उभे आहे” या विश्वासाची हमी आहे. पैसा नसल्यामुळे जीव धोक्यात येऊ नये, हीच या योजनेची खरी ताकद आहे. “आरोग्य परमं भाग्य,स्वास्थ्य सर्व सर्वार्थसाधनम्..! आरोग्य हेच खरे संपत्ती आहे.अन स्वास्थ्य सर्व साधनांची मूळ आहे.यामुळे हे सरकार निश्चित महाराष्ट्रातील गोरगरीब गरजू रुग्णांची अशीच काळजी घेतील.अशी अपेक्षा ठेवू या..

संपूर्ण राज्यात पेपरलेस प्रणाली, जिल्हा कक्षांची स्थापना आणि विविध सकारात्मक बदलांमुळे गरजू रुग्णांपर्यंत वेळेत मदत पोहोचत आहे. मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनानुसार कक्षाचे कामकाज पारदर्शक पद्धतीने राबवले जात आहे. लवकरच रूग्णांना त्यांच्या मोबाईलवर सीएमआरएफच्या माध्यमातून परिसरातील कोणत्या रूग्णालयात कोणत्या आजारावर उपचार होतील याबाबतची माहिती मिळणार आहे. पारदर्शक कामातून निधी खऱ्या गरजूंपर्यंत पोहोचत आहे. यापुढेही जास्तीतजास्त गरजू रुग्णांना मदत केली जाणार आहे.
— रामेश्वर नाईक,
कक्ष प्रमुख, मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, महाराष्ट्र

अर्ज कसा करावा…

https//cmrf.maharashtra.gov.in. या संकेतस्थळावर उपलब्ध

#पीडीएफ स्वरूपाचा सविस्तर अर्ज तुम्हाला aao.cmrf-maha@gov.in मिळू शकतो.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष संपर्क क्रमांक 022-22025540/ 22026948

अधिक चौकशी करिता टोल फ्री क्र. 9321103103 या क्रमाकांवर संपर्क साधावा.

कार्यालयात पत्ता – मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष, मुख्यमंत्री कार्यालयात, सातवा मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालयात मुंबई – 400032

खंडूराज गायकवाड
khandurajgkwd @gmail.com
(लेखक मंत्रालयातील वरिष्ठ राजकीय पत्रकार आहे.)

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments