नेरळ, कर्जत : उल्हासनदी बचाव अभियानास २०१८ पासून सुरुवात करण्यात आली असून दिवसेंदिवस उल्हास नदी ही प्रदूषणाच्या विळख्यात सापडत चालली आहे. विविध मानवी कृतींमुळे नदीमध्ये जलप्रदूषण वाढले असून त्यास जबाबदार देखील मानवच असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून तसेच प्रत्यक्ष नदीकिनारी जनजागृती करत उल्हासनदी बचाव अभियान राबवले जात आहे. नागरिकांना जलप्रदूषण रोखण्यासाठी विविध उपक्रमांद्वारे आवाहन केले जात आहे.
गणेशोत्सव काळामध्ये पूजेसाठी वापरले जाणारे साहित्य, हार-फुले, निर्माल्य हे विसर्जनावेळी नदीपात्रात टाकले जाते. त्यामुळे उल्हास नदी प्रदूषित होते आणि जलवाहिनी दूषित बनते. हे टाळण्यासाठी नदीकिनारी स्वयंसेवक, उल्हास नदी बचाव अभियानाचे कार्यकर्ते तसेच ग्रामपंचायतने उपलब्ध करून दिलेल्या कचराकुंड्यांमध्ये निर्माल्य टाकावे, असे आवाहन करण्यात आले आहे. हार-फुले इत्यादी सुका कचरा वेगळा जमा करून पर्यावरणपूरक पद्धतीने त्याचा निपटारा करण्याचे आवाहन करण्यात आले.
युवा पिढीने पुढाकार घेत पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याची गरज असल्याचे सामाजिक कार्यकर्ते केशव तरे (नेरळ, कर्जत) यांनी सांगितले.
त्यांनी नागरिकांना “आपली उल्हास माय वाचवण्याचा संकल्प करूया” असे आवाहन केले.