Sunday, August 24, 2025
घरमहाराष्ट्रकोकणातील युवकांनी स्फूर्ती घेऊन उच्च पदावर पोहोचावे - खासदार नारायण राणे

कोकणातील युवकांनी स्फूर्ती घेऊन उच्च पदावर पोहोचावे – खासदार नारायण राणे

प्रतिनिधी : सार्वजनिक जीवनात व राजकारणात काम करताना मला मिळालेल्या पदांना मी न्याय देण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री असताना राज्यात व देशात मला जो नावलौकिक मिळाला, त्यामागे शिवसेनाप्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे यांचा हा निर्णय होता, हे मला सांगताना आजही अभिमान वाटतो.मला दिलेल्या संधीचा उपयोग मी नेहमीच जनतेच्या कल्याणाकरिता सामाजिक, शैक्षणिक व विधायक कामांसाठी केला. या काळात कोकणचा खूप विकास झाला, आताही होत आहे, पुढेही होईल असे उदगार खासदार नारायण राणे साहेब यांनी मुंबईत काढले. मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईच्या वतीने आयोजित वृत्तपत्र लेखक दिनाच्या कार्यक्रमात ते आपले मनोगत व्यक्त करीत होते. ७७ व्या दिनानिमित्त रवींद्र मालुसरे यांनी संपादित केलेल्या “प्रेरक शिल्पकार” या ग्रंथाचे आणि वृत्तपत्र लेखकांनी सोशल मीडियावर मुक्तपणे आणि निर्भीडपणे व्यक्त व्हावे यासाठी बनविलेल्या “जागल्यांचा लोकजागर” या ब्लॉगरचे प्रकाशन नारायण राणे यांच्या हस्ते करण्यात आले.
राणे आपल्या भाषणात पुढे असेही म्हणाले की,जीवनात यशस्वी होण्यासाठी आणि उच्च पदावर पोहोचण्यासाठी अल्पसंतुष्ट न राहता सतत संघर्ष केला पाहिजे. मळलेल्या वाटेने जाण्यापेक्षा यशस्वी झालेल्यांपासून स्फूर्ती घेऊन कोकणातील युवकाने पुढे जायला हवे. आयएएस आणि आयपीएस चे प्रमाण अत्यल्प आहे ते भविष्यात वाढायला हवे. त्यासाठी लागणारी संसाधने उपलब्ध करून देण्यासाठी मी तयार आहे. मुलांनी उच्च शिक्षित व्हावे यासाठी मी सिंधुदुर्गात मेडिकल, इंजिनिअर कॉलेज काढले आहे. त्याची गुणवत्ता आता दिसत आहे. यापुढे आर्किटेक्ट असो किंवा अन्य कुणीही त्यांनी आयुष्यातील अपयशाच्या तक्रारीचा सूर न लावता आपली चाकोरी सोडून बाहेर पडायला पाहिजे तरच अधिक पैसे आणि नावलौकिक मिळेल.
देशाच्या तिजोरीत मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी असलेले शहर ३४ टक्के हिस्सा उचलते. याचा विचार मुंबई लगत असणाऱ्या कोकणी माणसांनी केला पाहिजे. कोकण हे समृद्ध बनले पाहिजे. मला राज्यात व केंद्रात जी-जी पदे मिळाली, त्याचा उपयोग मी महाराष्ट्राच्या व सिंधुदुर्ग जिल्ह्यात विकासासाठी केला, हे सांगताना मला अभिमान वाटतो.कोकणाच्या विकासाची अशी चर्चा होते, त्यामध्ये माझ्या नावाचाही उल्लेख होतो. त्याचे सर्व श्रेय मी कोकणी माणसालाच देतो. मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईच्या कार्यालयीन जागेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मी सरकारमध्ये असल्याने तुमच्या या मागणीसाठी मी संबंधितांसाठी बोलून तुमचा प्रश्न सोडवायचा प्रयत्न करील. असे आश्वासनही नारायण राणे यांनी सर्व ज्येष्ठ वृत्तपत्र लेखकांना दिले.
संघाध्यक्ष रवींद्र मालुसरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, २२ ऑगस्ट हा दिवस आम्हा वृत्तपत्र लेखकांसाठी उत्साहाचा आणि आनंदाचा असतो. राणे साहेब बेस्टचे चेअरमन असताना शिंदेवाडी येथील संघाच्या कार्यालयात आले होते. इतके जुने ऋणानुबंध आमचे त्यांच्याशी आहेत. आज हा कार्यक्रम राणे साहेबांची आठवण म्हणून त्याठिकाणी झाला असता, परंतु तेच कार्यालय आमच्याकडून महापालिकेने काढून घेतले आहे. अमृत महोत्सवी वाटचाल करणारी ही चळवळ निरंतर सुरु राहावी यासाठी राणेसाहेबांनी सरकारदरबारी आमच्यासाठी प्रयत्न करावा व मराठी माणसांच्या या संस्थेसाठी जीवदान द्यावे.
यावेळी संघाचे माजी अध्यक्ष मधू शिरोडकर, वि अ सावंत, विजय ना कदम, मनोहर साळवी यांच्यासह मधुकर कुबल, रमेश सांगळे, नितीन कदम, दिगंबर चव्हाण, सुनील कुवरे, राजन देसाई, श्रीनिवास डोंगरे, दिलीप ल सावंत, कृष्णा काजरोळकर,सतीश भोसले, एस एम बी न्यूज चॅनेल्स अँड प्रिंट मीडियाचे अशोक सावंत आदी पदाधिकारी आणि ज्येष्ठ वृत्तपत्र लेखक उपस्थित होते.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments