प्रतिनिधी : समाजातील गरजू व आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य पुरविण्यासाठी सुरू असलेल्या ‘एक वही, एक पेन’ या उपक्रमास विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोलाचा हातभार लावला आहे.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने हारफुलांसह शैक्षणिक साहित्य श्री गणेशचरणी अर्पण करून वंचित विद्यार्थ्यांना मदत करण्याचा संदेश या अभियानातून दिला जातो. या उपक्रमाच्या शिष्टमंडळाने, प्रणेते पत्रकार राजू झनके यांच्या नेतृत्वाखाली, डॉ. गोऱ्हे यांच्या शासकीय निवासस्थानी भेट दिली.
मागील दहा वर्षांत हजारो विद्यार्थ्यांना मदत पोहोचविणाऱ्या या अभियानाचे डॉ. गोऱ्हे यांनी कौतुक करत शिक्षणापासून कोणताही घटक वंचित राहू नये, यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर डॉ. गोऱ्हे यांनी स्वतः शैक्षणिक साहित्य देऊन सहभाग नोंदवला तसेच समाजालाही आवाहन केले की, “गणेशोत्सवात हारफुलांसह शैक्षणिक साहित्य अर्पण करून वंचित विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी हातभार लावा.”
या भेटीत शिष्टमंडळात अविनाश गरुड, राजेश उबाळे, राजू लोखंडे, सुनील वाकोडे, पत्रकार काशिनाथ म्हादे, सुरेश ठमके आदी मान्यवर उपस्थित होते.