मुंबई – रोश फार्मा इंडिया आणि मल्टिपल स्क्लेरोसिस सोसायटी ऑफ इंडिया (MSSI) यांच्या संयुक्त विद्यमाने “वॉक इन माय शूज” हा अभिनव जनजागृती उपक्रम राबविण्यात आला असून याचा उद्देश मल्टिपल स्क्लेरोसिस (MS) या जीवनमर्यादित न्यूरोलॉजिकल आजाराशी झुंज देणाऱ्या रुग्णांच्या अदृश्य वेदना व संघर्ष समाजापर्यंत पोहोचवणे हा आहे.
भारतासह जगभरातील कोट्यवधी लोकांना भेडसावणाऱ्या या आजारामुळे रुग्णांच्या दैनंदिन जीवनातील अगदी साधी कामे करणेसुद्धा कठीण ठरतात. या पार्श्वभूमीवर 22 ते 24 ऑगस्टदरम्यान मुंबईतील फिनिक्स मार्केटसिटी (कुर्ला), नवी दिल्लीतील सिलेक्ट सिटी वॉक मॉल (साकेत) आणि 20 ते 22 ऑगस्टदरम्यान बेंगळुरूतील ब्रूकफिल्ड इकोस्पेस पार्क येथे विशेष सिम्युलेशन झोन उभारण्यात आले आहेत. येथे नागरिकांना एम.एस. रुग्णांना दररोज भेडसावणाऱ्या संतुलन हरवणे, स्नायूंच्या हालचालींवर परिणाम, अस्पष्ट दिसणे आणि संवेदनाशक्ती कमी होणे अशा प्रमुख लक्षणांचा संवेदनात्मक अनुभव घेता येईल.
या उपक्रमाद्वारे एम.एस. रुग्णांबद्दल सहानुभूती निर्माण करण्याबरोबरच योग्य निदान, उपचारांची उपलब्धता, विमा कव्हरेज आणि आरोग्य व्यवस्थेमध्ये आवश्यक बदल घडवून आणण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांना #WalkInMyShoes या हॅशटॅगद्वारे या मोहिमेत सहभागी होऊन एम.एस.बाबत मौन तोडण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.