मुंबई, २१ ऑगस्ट : वसई-विरार महानगरपालिकेचे माजी आयुक्त आणि आयएएस अधिकारी अनिल पवार यांच्याविरोधात ईडीने केलेल्या कारवाईवर त्यांच्या वकिलांनी गंभीर आक्षेप नोंदवला आहे. ईडीने ४१ अनधिकृत इमारतींच्या बांधकामांशी संबंधित लाच आणि १.३३ कोटी रुपयांच्या रोकडीबाबत केलेला दावा चुकीचा असल्याचे त्यांचे वकील डॉ. उज्वलकुमार चव्हाण यांनी स्पष्ट केले.
मुंबई प्रेस क्लब येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. चव्हाण यांनी सांगितले की, जप्त केलेली रोकड पवार यांच्याकडून नव्हे तर विकासक जनार्दन पवार यांच्याकडून जप्त करण्यात आली आहे. तसेच, २००८ पासून उभारल्या गेलेल्या अनधिकृत इमारतींचे पाडकाम स्वतः पवार यांनीच केले होते. त्यांना २०२२ मध्ये आयुक्तपद मिळाले असल्याने लाच स्वीकारल्याचा आरोप निराधार असल्याचे ते म्हणाले.
डॉ. चव्हाण यांनी पुढे नमूद केले की, ईडीच्या प्रसिद्धीपत्रकात दाखवलेला मुद्देमाल हा पवार यांचा नसून दुसऱ्या आरोपी वाय. एस. रेड्डी यांचा आहे. पवार यांच्या नातेवाईकांच्या कंपन्यांची लेखापरीक्षणे झालेली असून त्यांनी करसुद्धा भरले आहेत. तरीही ईडीने योग्य तपासाऐवजी दिशाभूल करणारी माहिती पसरवली आणि पुराव्यांची साखळी सादर केली नाही.
शेवटी, डॉ. चव्हाण यांनी निष्पक्ष आणि पारदर्शक तपासाची मागणी करत पवार यांच्यावरील आरोप चुकीचे असल्याचे ठामपणे सांगितले.