प्रतिनिधी : सावंतवाडी पाटी माळवाडी (ता. शिराळा) येथील श्री. विकास शिरसट (आण्णा) यांची शिराळा तालुका पोलीस पाटील संघटनेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
या प्रसंगी महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघटनेचे राज्याध्यक्ष मा. बाळासाहेब शिंदे-पाटील तसेच सातारा पोलीस ठाण्याच्या डीवायएसपी मा. वैशाली कडूकर यांच्या हस्ते श्री. शिरसट यांना नियुक्तीपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
सामाजिक कार्याची आवड आणि लोकसेवेचा ध्यास घेऊन कार्यरत असलेल्या श्री. विकास शिरसट यांनी आपल्या उद्योग व्यवसायासोबतच पोलीस पाटील पदाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली आहे. शिराळा तालुक्यातील अनेक प्रश्न सोडवण्यात त्यांनी पुढाकार घेतला असून, त्याच कामगिरीची दखल घेत त्यांची या महत्वाच्या पदावर निवड करण्यात आली आहे.
या निवडीनंतर शिराळा, शाहूवाडी, पाटण, कराड तालुक्यासह मेणी खोरा परिसरातून आण्णा यांचे जोरदार स्वागत व कौतुकाचा वर्षाव होत आहे. सध्या ते संपूर्ण मेणीखोऱ्याच्या पदभाराची जबाबदारी सांभाळत आहेत.