Wednesday, August 20, 2025
घरमहाराष्ट्रनव्या काळातील बदल स्वीकारणारी पिढी ‘एमकेसीएल’ने घडवावी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

नव्या काळातील बदल स्वीकारणारी पिढी ‘एमकेसीएल’ने घडवावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचा रौप्य महोत्सव कार्यक्रम

पुणे : कृत्रिम बुद्धीमत्तेच्या वेगवान लाटेत समाजात होणारे नवे बदल स्वीकारणारी आणि त्यांना सक्षमपणे सामोरे जाणारी पिढी महाराष्ट्र ज्ञान महामंडळाने घडवावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ‘एमकेसीएल’च्या नावीन्यपूर्ण आणि विकासाभिमूख उपक्रमांत राज्य शासनही अग्रेसर राहील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

बाणेर येथील बंटारा भवन येथे महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (एमकेसीएल) च्या रौप्य महोत्सवी स्थापना दिवस कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार, माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील, ‘एमकेसीएल’चे अध्यक्ष पद्मविभूषण डॉ.अनिल काकोडकर, संस्थापक पद्मभूषण डॉ.विजय भटकर, डॉ.विवेक सावंत, ‘एमकेसीएल’चे व्यवस्थापकीय संचालक समीर पांडे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, आज कृत्रिम बुद्धीमत्तेचे मोठे आव्हान आपल्यासमोर असतांना हे ज्ञान शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचविणे महत्त्वाचे आहे. डेटा हा जगातील संपत्तीचा भाग झाला आहे. या परिस्थितीत नवी मूल्ये आणि आव्हाने ओळखून पुढे जावे लागेल. क्वांटम कम्युटींग, कृत्रिम बुद्धीमत्ता आणि सेमीकॉन या तीन क्षेत्रात उत्तम मनुष्यबळ निर्माण करून नव्या लाटेत आपल्याला पुढे जाता येईल. महाराष्ट्र हे देशाचे डेटा सेंटर कॅपीटल आहे. देशातील ६० टक्के डेटा सेंटर क्षमता महाराष्ट्राकडे आहे, या सुविधांचा लाभ घेण्याचे प्रयत्न ‘एमकेसीएल’ने करायला हवे. राज्य शासन त्यांच्या प्रत्येक प्रयत्नात सहकार्य करेल.

माहिती तंत्रज्ञान लाटेप्रमाणे कृत्रिम बुद्धीमत्तेच्या काळात आपल्याला पुढे रहावे लागेल. रोजगाराचे स्वरुप बदलत असतांना नवे ज्ञान आणि तंत्रज्ञान नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था उभी केली तर राज्य शासन त्याला निश्चितपणे सहकार्य करेल. ‘एमकेसीएल’चे विविध उपक्रम समाजासाठी आणि शासनासाठी उपयुक्त ठरले आहेत. ‘एमकेसीएल’ने विकसित केलेल्या नव्या संकेतस्थळावर ५० हजार पुस्तके वाचता येणार आहेत. ‘एमकेसीएल’च्या विविध प्रकल्पामुळे प्रशासनात पारदर्शकता आणण्यासोबत कार्यक्षमतेतही वाढ झाली आहे. गेल्या २५ वर्षात उत्तम प्रकारचे बदल ‘एमकेसीएल’ने घडवून आणले आहेत, असे मुख्यमंत्री यांनी सांगितले.

कुठल्याही समाजजीवनात नेहमी आव्हाने येत असतात आणि त्यावर उत्तरे शोधणाऱ्या व्यक्ती-संस्था उभ्या राहतात. जगात इंटरनेटची लाट आली असतांना डिजीटल विषमतेसंदर्भातील समाजजीवनापुढच्या प्रश्नाला उत्तर शोधण्यासोबत ते सर्वांपर्यंत पोहोचविणारी व्यवस्था उभी करण्याचे कार्य महाराष्ट्र ज्ञान मंडळाने केले. समाजातील एक विशिष्ट वर्गाला पुढे आणण्यासाठी केवळ लाभाचा विचार न करता दीर्घकालीन लाभ लक्षात घेऊन ‘एमकेसीएल’ने जबाबदारीने उत्तम प्रकारचे कार्य केले. राज्यात साडेसहा हजार उद्योजकांचे जाळे आणि कोणत्याही क्षणी समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्याची व्यवस्था या माध्यमातून उभी राहिली. सामान्यातल्या सामान्य माणसाला आपण या व्यवस्थेत आणू शकलो, अशा शब्दात मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी ‘एमकेसीएल’च्या कार्याचे कौतुक केले.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments