पुणे : दिवंगत चित्रकार रवी परांजपे यांनी साकारलेल्या 72 मुळ पेंटिग्ज आणि 67 फ्रेम आर्ट वर्क अशा एकूण 139 चित्र कलाकृती महाराष्ट्र शासनास सुपूर्त करण्यात आल्या असून आज त्यांच्या निवासस्थानी सांस्कृतिक कार्य मंत्री ॲङ आशिष शेलार यांनी जाऊन सामंजस्य करार केला. या कलाकृती सन्मानपूर्वक जतन करु, अशी ग्वाही ही त्यांनी दिली.
दिवंगत चित्रकार रवी परांजपे यांनी साकारलेल्या 72 मुळ पेंटिग्ज आणि 67 फ्रेम आर्ट वर्क अशा एकूण 139 चित्र कलाकृती महाराष्ट्र शासनास सुपूर्त करण्याची इच्छा दिवंगत रवी परांजपे यांच्या पत्नी स्मिताताई परांजपे यांनी व्यक्त केली होती. त्याप्रमाणे दि. 26 जून 2023 रोजी या कलाकृती जहांगिर आर्ट गॅलरी येथील कार्यक्रमानंतर पुरातत्व संचालनालयाच्या ताब्यात दिल्या होत्या. मात्र अधिकृतरित्या करारनामा करण्यासाठीची बाब शासनाच्या विचाराधीन होती. या कलाकृती प्राप्त करुन सातारा येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयामध्ये स्थलांतरीत करण्यात आलेल्या आहेत.
आता, या कलाकृती स्विकारण्यास व यासंबंधीच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यास सांस्कृतिक कार्य मंत्री ॲङ आशिष शेलार यांच्या पुढाकारामुळे दि. 17.06.2025 रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता दिली.
त्याप्रमाणे सर्व शासकीय सोपस्कार पार पडल्यानंतर ॲङ आशिष शेलार यांनी आज स्मिताताई परांजपे यांच्या मॉडेल कॉलनी, शिवाजीनगर पुणे येथील निवासस्थानी प्रत्यक्ष भेट घेऊन सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली.
सुमारे साडे चार कोटीं पेक्षा जास्त किमतीच्या या कलाकृती सध्या सातारा संग्रहालयामध्ये तात्पुरत्या स्वरुपात प्रदर्शित करण्यात आलेल्या आहेत. नंतर राज्यभर या चित्र कलाकृती शासनाच्या अधिनस्त असलेल्या विविध संग्रहालयांमध्ये जनसामान्यांना पाहण्याकरिता प्रदर्शित करण्यात येणार आहेत. याचा फायदा संपूर्ण राज्यातील विद्यार्थ्यांना होणार असून या चित्र कलाकृतींपासून प्रेरणा घेऊन नवीन पिढी आपल्या उज्वल भवितव्याकरिता कलेचे आणि व्यावसायिकतेचे उत्तम धडे गिरवतील व प्रेरित होतील अशी आशा आहे. या चित्र कलाकृतींमधील मोठा भाग मुंबई येथील नियोजित महाराष्ट्र राज्य वस्तुसंग्रहालयामध्ये प्रदर्शित करण्याचेही प्रस्तावित आहे.