सातारा(अजित जगताप) : सातारा शहर व परिसरात डॉल्बीच्या न्यायालयाच्या आदेशापेक्षाही जास्त कर्कश्य आवाजाने जिल्हा प्रशासन व पोलीस यंत्रणा हतबल झाल्याचे दिसून येत आहे. यामध्ये आता ज्येष्ठ नागरिकांनीच हाती क्रांतीची मशाल घेऊन पावसात रॅली काढली आहे. त्यामुळे डॉल्बी विरोधी आवाज सातारा नगरपालिका निवडणुकापर्यंत घुमणार असल्याचे दिसून आले आहे. तुम्ही डॉल्बी जोरात वाजवा… आम्ही नगरपालिका मतदानातून आवाज खाली आणतो. असा नवीन नारा सुरू झालेला आहे.
सार्वजनिक गणेशोत्सव म्हणजे भाविकांसाठी धार्मिक उत्सव असतो. याला गालबोट लावणाऱ्या टोळक्यांचा मोठ्या आवाजातील डॉल्बी मध्ये जीव अडकला आहे. पोलीस व जिल्हा प्रशासन यंत्रणा दबावाखाली काम करत असल्यामुळे जेष्ठ नागरिकांनी या विरोधात मोर्चा काढून आवाज बुलंद केला आहे. लोकशाही मार्गाने सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या कार्यालयात जाऊन निवेदन दिले. त्यांचे स्वीय सहाय्यक रवी कांत जाधव यांनी निवेदन स्वीकारताना हात जोडले.
सातारा जिल्हा पालकमंत्र्यांनी घोषणा करूनही डॉल्बीचा मोठा आवाज सातारा शहरात थांबला नाही. त्यांच्याकडे घटनात्मक पद आहे. अधिकार आहे. पण त्यांच्याही वाहनाचा सायरन चा आवाज कमी होऊ नये. म्हणून ते निर्णय घेत नाहीत का? अशी आता ज्येष्ठ नागरिक टीका करू लागलेली आहेत.
आज सोमवार दिनांक १९ ऑगस्ट रोजी भर पावसात ज्येष्ठ नागरिकांनी राजवाडा ते गोल बागे जवळ एकत्र येऊन मोर्चाला सुरुवात केली .डॉल्बी विरोधात निषेधाचे फलक सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या आयुष्यातील उर्वरित दिवसांसाठी हृदय आणि कान शाबूत ठेवण्या साठी स्वतःच सल्ल्यानुसार मोर्चाचे आयोजन केले आहे. त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
साताऱ्यातील जेष्ठ नागरिकांना रस्त्यावर उतरण्याची वेळ आल्यामुळे सातारा शहर हे पेन्शन शहर आहे. हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. सुमारे १५० आजी- आजोबांनी यामध्ये सहभागी झाले होते. ज्येष्ठ नागरिकांच्या संघटनेनेही मोर्चात सहभागी होऊन आपले कर्तव्य पार पाडलेले आहे.
आंदोलन समन्वयक प्रसाद चाफेकर, डॉ. रोहिणी पंचपोर, प्रकाश कांबळे, विजय पाटील त्याचबरोबर अनेक ज्येष्ठ नागरिकांनी घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. डॉल्बी लावण्याला विरोध नाही. परंतु, डॉल्बी आवाज न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे असणे गरजेचे आहे. आरतीच्या वेळेला डॉल्बी लावलेल्याचे कुणी पाहिलेले नाही . फक्त मिरवणुकीमध्येच डॉल्बी का ? लावला जातो. याची आता धार्मिक संघटनेचे समर्थन करणारांनी आत्मचिंतन करावे. असाही सल्ला जेष्ठ नागरिकांनी दिला आहे. दरम्यान, सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीपर्यंत डॉल्बी विरोधी आवाज घुमला तर खऱ्या अर्थाने क्रांती यशस्वी होईल. यासाठी जेष्ठ नागरिक प्रयत्न करत असल्याचे ज्येष्ठ नागरिकांच्या चर्चेतून दिसून आले आहे.
____________________
फोटो — साताऱ्यात त डॉल्बी विरोधात ज्येष्ठ नागरिकांचा मोर्चा (छाया– अजित जगताप, सातारा)