मुंबई : भारतीय हवामान खात्याने मंगळवार, दि. १९ ऑगस्ट २०२५ रोजी मुंबई शहर आणि उपनगरांसह बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रासाठी अतिमुसळधार पावसाचा (रेड अलर्ट) इशारा दिला आहे. सातत्याने कोसळणाऱ्या पावसाच्या पार्श्वभूमीवर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण या नात्याने बृहन्मुंबई महानगरपालिकेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शासकीय, निमशासकीय तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यालयांना (अत्यावश्यक सेवा वगळता) आज दिनांक १९ ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. महानगरपालिकेने खासगी कार्यालये व आस्थापना यांना आपल्या कामकाजाच्या स्वरूपानुसार कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने घराबाहेर पडणे टाळावे, असेही आवाहन करण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवा पूर्ववत सुरू राहणार असून, पावसामुळे उद्भवणाऱ्या आणीबाणीच्या परिस्थितीसाठी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क आहे.