न
ेरुळ, नवी मुंबई : नेरुळची उगवती तारा सान्वी विवेक शिंदे हिने उत्तराखंड येथील महाराणा प्रताप स्टेडियमवर ७ ते १० ऑगस्ट दरम्यान पार पडलेल्या *राष्ट्रीय ऍक्रोबॅटिक जिम्नॅस्टिक्स* स्पर्धेत आपल्या अद्वितीय कामगिरीने सुवर्ण अक्षरांत नाव कोरले आहे. *नेरुळ जिमखाना – जिमएन्जॉय* येथे आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्सची बेसिक ट्रेनिंग आणि *श्री नारायण आचार्य विद्यानीकेतन, चेंबूर* येथे स्पर्धेची तयारी घेतलेल्या सान्वीने कौशल्य, जिद्द आणि नजाकतीचे उत्तम मिश्रण सादर केले.
*सान्वीने वैयक्तिक प्रकारातील बॅलन्स, डायनॅमिक आणि कॉम्बिनेशन या तिन्ही प्रकारांत सुवर्णपदके पटकावली* तसेच *टीम चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक जिंकले.* या चमकदार यशामुळे तिला स्पर्धेचा मानाचा किताब *‘गोल्डन गर्ल’* मिळाला.
सान्वी आता आपल्या सहकारी आदित्य दिघे सोबत ज्युनियर गट मिक्स पेअर कॅटेगरीत भारताचे प्रतिनिधित्व करत आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत उतरतील.
या स्पर्धेत *श्री नारायण आचार्य विद्यानीकेतन विद्यालयाचे २२ खेळाडू सहभागी झाले होते, त्यापैकी तब्बल १७ जणांनी आशियाई अजिंक्यपद स्पर्धेसाठी आपली निवड पक्की केली आहे.* ही स्पर्धा येत्या ऑक्टोबर महिन्यात गोवा येथे होणार आहे.
*महाराष्ट्राच्या* पथकानेही राष्ट्रीय स्पर्धेत दमदार छाप सोडली. *१०२ ऍक्रोबॅटिक जिम्नॅस्ट्सनी सहभाग घेतला आणि १८ सुवर्ण, १९ रौप्य व ४ कांस्य पदके जिंकून राज्याच्या झोळीत एकूण पदक संख्येच्या ५० टक्के पदके जमा केली.* ही महाराष्ट्राच्या वर्चस्वाची ठळक साक्ष आहे.
स्थानिक प्रशिक्षणगृहातून राष्ट्रीय पातळीवर झेपावलेली सान्वी शिंदे ही मेहनत, तयारी आणि आवडीच्या जोरावर यशाचे शिखर कसे गाठता येते याचे प्रेरणादायी उदाहरण ठरली आहे. आता आशियाई स्पर्धेची उलटी गिनती सुरू झाली असून, नेरुळच्या या ‘गोल्डन गर्ल’कडून पुन्हा एकदा थरारक कामगिरीची अपेक्षा आहे.