सध्या श्रावण महिना सुरु आहे. देवांचा देव महादेव, अर्थात भगवान शंकराचा म्हणून हा श्रावण महिना पाळण्यात येतो. त्याचप्रमाणे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचाही ‘मार्मिक’, ‘शिवसेना’ आणि ‘सामना’ हा त्रिशूळ म्हणून ओळखण्यात येतो. बाळासाहेबांनी ‘मार्मिक’ सुरु केला आणि त्याला प्रसववेदना लागून सहा वर्षांत ‘शिवसेना’ जन्माला आली. ‘शिवसेना’ फोफावू लागली आणि मग मार्मिक अपुरा पडू लागला. म्हणून बाळासाहेबांनी सामना सुरु केला. ‘खींचो न कमान को न तलवार निकालो, जब तोप मुकाबिल है तो अखबार निकालो !’, हे ब्रिदवाक्य मार्मिक ने आपल्या भाळी कोरुन ठेवले आहे. ‘मुंबई’सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे यासाठी झालेली चळवळ यशस्वी झाली आणि १ में १९६० रोजी संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात आला. महाराष्ट्र तर मिळाला परंतु मराठी भाषेची उपेक्षा, अवहेलना या मुंबई महाराष्ट्रात सुरु झाली. मुंबईत असलेल्या आस्थापनांमध्ये मराठी टक्का कमी होत गेला. दाक्षिणात्यांचा भरणा वाढत गेला. बरोबर हीच गोष्ट हेरुन बाळासाहेब ठाकरे यांनी १३ ऑगस्ट १९६० रोजी मार्मिक हे जागतिक पातळीवर एकमेव मराठी व्यंगचित्र साप्ताहिक सुरु केले. बाळासाहेब हे स्वतः आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्यंगचित्रकार म्हणून नावारूपाला आले होते. त्यांच्या कुंचल्याचा प्रसाद अनेकांना मिळाला होता. मराठी माणसावर होणाऱ्या अन्यायाचा नाश करून त्याला न्याय मिळवून देण्यासाठी बाळासाहेबांनी मार्मिक मधून मराठी टक्का किती कमी झाला ? किती घसरला ? या वर्मावर मार्मिक मधून नेमके बोट ठेवले. यासाठी त्यांनी मार्मिक मधून दाक्षिणात्य लोकांची नांवे प्रसिद्ध करतांना ‘वाचा आणि थंड बसा’ हे चपखल शीर्षक दिले. या यादीत तुलनेने मराठी अधिकाऱ्यांची नांवे कमी आढळून येत होती तर परप्रांतीयांच्या लोकांची नांवे जास्त प्रमाणात दिसून येत होती. ‘मार्मिक’ मधून ही परप्रांतीय लोकांची नांवे प्रसिद्ध होत आहेत, हे लक्षात येता येता त्याचा परिणाम होऊ लागला. मराठी माणूस जागृत होऊ लागला. आणि मग बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६६ रोजी ‘शिवसेना’ ही मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी लढाऊ संघटना स्थापन केली. बाळासाहेब ठाकरे यांचे वडिल केशव सीताराम ठाकरे ऊर्फ प्रबोधनकार यांचे मार्गदर्शन घेत बाळासाहेब ठाकरे यांनी मार्मिक आणि शिवसेनेची वाटचाल सुरु ठेवली. ही वाटचाल सुरू ठेवतांना बाळासाहेबांनी ऐंशी टक्के सामाजकारण आणि वीस टक्के राजकारण हे सूत्र स्वीकारुन निवडणुकीच्या राजकारणात प्रवेश केला. हळूहळू ठाणे आणि मुंबई पादाक्रांत करण्यास प्रारंभ केला. १३ ऑगस्ट १९६० रोजी सुरु करण्यात आलेल्या मार्मिक ने निवडणुकीच्या काळात कात टाकत सांज दैनिकाचे रुप धारण केले. सांज मार्मिक ने शिवसेनेच्या वाटचालीत ‘वाघा’चा वाटा उचलला. शिवसेना फोफावू लागली. बाळासाहेबांच्या कुंचल्याचे फटकारे गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या नेत्यांना बसू लागले. बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबर त्यांचे पाठचे बंधू श्रीकांत ठाकरे आणि प्रमोद नवलकर हेही मार्मिक मध्ये सक्रिय होते. पंढरीनाथ सावंत, विजय वैद्य, भाऊ तोरसेकर, विलास मुकादम, केशव शिर्सेकर, दिलीप ठाकूर, विजय साखळकर, ह. मो. मराठे, वसंत सोपारकर, श्रीरंग धारप तसेच श्रीकांत आंब्रे, संजय डहाळे, विकास काटदरे यांनीही आपले योगदान सुरु ठेवले. १९६८ साली मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मार्मिक ने आपला अवतार सांज मार्मिक म्हणून मुंबईत सुरु केला. या सांज मार्मिक साठी श्रीकांत ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरीनाथ सावंत आणि विजय वैद्य अहोरात्र काम करीत असत. छापखान्यातच पंढरीनाथ सावंत आणि विजय वैद्य यांनी रात्र रात्र जागून काम केले. दिवाकर रावते यांनी तर मार्मिक घरोघरी जाऊन मार्मिकचे वितरण केले आहे. मार्मिक हे आंतरराष्ट्रीय पातळीवर चे पहिले वहिले मराठी व्यंगचित्र साप्ताहिक म्हणून आपला ठसा उमटवला. व्यंगचित्र साप्ताहिक असल्याने ओघानेच बाळासाहेब, श्रीकांत, राज ठाकरे, विकास सबनीस, प्रभाकर वाईरकर, बाळ मुणगेकर, प्रभाकर झळके यांनी मैफिलीत कुंचल्यातून रंग भरले. रविवारची जत्रा तर मधली दोन पाने बाळासाहेब स्वतः रंगवीत असत. त्यामुळे आता बाळासाहेब ठाकरे यांच्या कुंचल्याचा फटका कुणाला बसणार याची उत्कंठा वाचकांना लागलेली असायची. बाळासाहेबांवर आणि शिवसेनेवर होणाऱ्या टीकेचा समाचार मार्मिक मधून यथायोग्य पद्धतीने घेण्यात येत असे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत आचार्य प्रल्हाद केशव अत्रे, प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे एकत्र होते. परंतु संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर अत्रे ठाकरे वेगवेगळे झाले. परिणामी अत्रे ठाकरे वादही महाराष्ट्राने पाहिला. मार्मिक मधून बाळासाहेबांनी सणसणीत उत्तर दिल्यानंतर हा वाद जेमतेम मिटला. तसे अत्रे आणि ठाकरे यांचे घनिष्ठ संबंध होते. प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे आणि आचार्य प्रल्हाद केशव अत्रे हे दोघेही संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अग्रेसर होते. परंतु ठाकरे अत्रे यांच्या मध्ये तात्विक मतभेद होताच त्यांच्यातील ठिणग्यांचे चटके सुद्धा बसलेले पहायला मिळाले. शिवसेना महाराष्ट्रात जसजशी फोफावली तसतसे मार्मिक अपुरे पडू लागले. तेंव्हा बाळासाहेबांनी सामना दैनिक २३ जानेवारी १९८९ रोजी सुरु करीत आपला ‘त्रिशूळ’ पूर्णत्वास नेला. शिवसेना हळूहळू सत्तेच्या कोंदणात बसू लागली. यासाठी मार्मिक आणि सामना ची भूमिका महत्वपूर्ण ठरली. मार्मिक चे स्वरुप हळूहळू बदलू लागले. कार्यकारी संपादक पंढरीनाथ सावंत असतांना राजकीय बरोबरच वैज्ञानिक खाद्यही वाचकांना मिळू लागले. श्रीकांत ठाकरे, प्रमोद नवलकर, वसंत सोपारकर हे काळाच्या पडद्याआड गेले. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख आणि मुख्य संपादक बाळासाहेब ठाकरे यांचे १७ नोव्हेंबर २०१२ रोजी महानिर्वाण झाले. मग उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मार्मिक, सामना आणि दोपहर का सामना ची धुरा यशस्वीपणे सांभाळली. बदलत्या राजकीय परिस्थिती मध्ये उद्धव ठाकरे यांच्या कडे महाराष्ट्राची सूत्रे येताच सौ. रश्मी उद्धव ठाकरे यांनी ही धुरा समर्थपणे आपल्या खांद्यावर पेलली. पंढरीनाथ सावंत वयाच्या नव्वदीकडे झेपावले त्यामुळे त्यांच्या शारीरिक क्षमता हळूहळू कमी होत गेल्या. त्यांना महाराष्ट्र शासनाने लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या नावाने जीवनगौरव पुरस्कार दिला तर विजय वैद्य यांना मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचा ज्येष्ठ पत्रकार कृ. पां. सामक जीवनगौरव पुरस्कार राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते राजभवनात शानदार समारंभात देण्यात आला. पंढरीनाथ सावंत यांनी शेवटच्या श्वासापर्यंत सेवा देण्याचे अभिवचन बाळासाहेबांना दिले होते परंतु कणखर मनाच्या, तल्लख बुद्धिच्या गिरणगाव च्या पंढरीला शारीरिक मर्यादा आल्या. ज्येष्ठ पत्रकार मुकेश माचकर मार्मिकचे कार्यकारी संपादक झाले. श्रीकांत आंब्रे, नितीन फणसे, संजय डहाळे, प्रशांत कदम, योगेंद्र ठाकूर, राजू वेर्णेकर, सचिन परब, प्रमोद चुंचूवार, विकास झाडे, प्रशांत केणी, प्रसाद ताम्हणकर, आदि सहकाऱ्यांच्या नव्या फळीने तसेच गौरव सर्जेराव यांच्या सह नवनव्या व्यंगचित्रकारांनी मार्मिकचे रुपडे पालटून टाकीत आधुनिकतेची झालर चढविलेल्या मार्मिक ला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. मुकेश माचकर यांनी आजही थोर आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीचे व्यंगचित्रकार, मार्मिकचे संस्थापक संपादक, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांची गाजविलेली व्यंगचित्रे मधल्या पानांवर बाळासाहेब ठाकरे यांचे फटकारे या शीर्षकाखाली बदलत्या काळात सुद्धा दर्शन घडवीत आहेत. नव्याने वाचकांसमोर आणून जुन्या स्मृतींना उजाळा दिला आहे. राजकीय परिस्थिती झपाट्याने बदलत असतांना मार्मिकचा आसूड अन्यायावर जोरदारपणे बसू लागला. सचिन परब यांनी प्रबोधनकार ठाकरे यांचे शंभर वर्षांपूर्वी चे साहित्य वाचकांच्या शिदोरीत जमा करण्याचे भगीरथ कार्य केले आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे फटकारे बदलत्या काळात सुद्धा दर्शन घडवीत आहेत. विलासराव देशमुख यांच्या भाषेत ‘कंटिन्युटी विथ चेंज’ म्हणजे ‘बदलातही सातत्य’ ही मार्मिक ची ओळख दिसू लागली. कितीही संकटे आली तरीही शिवसेना आणखीही नव्या जोमाने फोफावणार. पुनश्च हरी 🕉️ करीत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी पुन्हा आपल्या खांद्यावर मार्मिक, सामना आणि दोपहर का सामना ची धुरा स्वीकारली असून शिवसेनेच्या शतकाकडे झेप घेण्याच्या या यशस्वी वाटचालीत मार्मिकचा हा ‘वाघा’चा वाटा निश्चितपणे राहणार हे निःसंशय ! 🚩दिवाकर आणि दिवेकर : ‘मार्मिक’चे घरोघरीचे वितरक !🚩 हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर शिवसैनिक दिवाकर रावते आणि दत्ता दिवेकर हे दोघेही दादर परळ लालबागचे. ‘मार्मिक’ च्या सुरुवातीच्या काळात असंख्य संकटांचा ‘सामना’ ‘मार्मिक’ ला करावा लागला. त्यावेळी ‘मार्मिक’चे अंकाचे गठ्ठे छापखान्यातून घेऊन त्यांची जुळणी, बांधणी करुन मराठी माणसाच्या घरोघरी नेऊन पोहोचविण्याचे आणि मराठी माणसाच्या मनात जागृतीचे ज्योत पेटविण्याचे भगीरथ कार्य दिवाकर रावते आणि दत्ता दिवेकर यांनी केले. मार्मिक आणि शिवसेना यांच्या यशस्वी वाटचालीचा हाच खरा पाया आहे. दिवाकर आणि दिवेकर यांनी घातलेल्या या भरभक्कम पायाला विसरता येणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावरील जगदीश्वराच्या मंदिराच्या पायरीवर हिरोजी इंदुलकर या निष्ठावंत कामगाराचे नांव आहे. या पायरीवर पाय ठेवून महाराजांनी जगदीश्र्वराचे दर्शन घ्यावे, ही हिरोजी इंदुलकर यांची भावना होती. तितकेच महत्त्वाचे काम दिवाकर रावते आणि दत्ता दिवेकर यांचे हे नि: संशय ! आज हे दोघेही निष्ठेने शिवसेनेच्या कार्यात स्वतःला झोकून देऊन काम करीत आहेत.🚩. १३ ऑगस्ट हा जसा मार्मिक चा वर्धापन दिन तद्वतच आचार्य अत्रे यांचा जन्मदिवस. हा एक अपूर्व योगायोग ! आई तुळजाभवानी आणि आई एकवीरा देवी या सर्वच सहकाऱ्यांना उदंड आयुष्य आणि ठणठणीत आरोग्य देवो, शंभर नंबरी शतकी सोने म्हणून खळाळत्या, धगधगत्या महाराष्ट्राला अनुभवायला मिळो, सर्वच अन्यायी जळमटांचा नायनाट होवो, ही प्रार्थना ! ।। यशस्वी भव ।। ।। जय महाराष्ट्र ।।
– योगेश वसंत त्रिवेदी, 9892935321. (लेखक ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आहेत)