प्रतिनिधी : काँग्रेस इंडिया आघाडीच्या उत्तर मध्य मुंबई मतदार संघातील उमेदवार प्रा. वर्षा गायकवाड यांच्या प्रचाराने वेग घेतला आहे. दररोज मॉर्निंग वॉकसह स्थानिक जनतेशी संवाद साधत त्या जनतेच्या समस्या जाणून घेत आहेत. सोसायटीमध्ये जाऊन रहिवाशांशी थेट संवाद साधण्यावर त्यांचा भर आहे. विविध प्रार्थना स्थळांनाही भेट देत आहेत. आज वांद्रे पश्चिम येथील माऊंट मेरी चर्च व अंधेरी पूर्व येथील चर्चमध्ये जाऊन ख्रिश्चन धर्मगुरुंची भेट घेतली.
“वांद्रे येथील ब्रह्मकुमारी केंद्राला भेट दिली. यावेळी शोबा बेन आणि स्मिता बेन या भगिनींसोबत संवाद साधण्याची संधी मिळाली. प्रचाराच्या व्यस्त वेळापत्रकात त्यांनी शिकवलेले ध्यान तंत्र ऐकणे आणि सराव करणे खूप आनंददायक होते. ध्यान संपल्यानंतर या भगिनींनी प्रसाद देऊन आशीर्वाद दिले. यावेळी माझे सहकारी आसिफ झकारिया, कॅरेन डीमेलो, कविता रॉड्रिक्स आदी उपस्थित होते”.
सांताक्रूज पूर्व भागातील गोळीबार मैदान येथील सिटी प्राईड बिल्डिंगमधील रहिवाशी व पॅरामाऊंट एसआरए बिल्डिंगमधील रहिवाशांशी संवाद साधला. वांद्रे पूर्व भागातील हिल रोड जंक्शन,जैन मंदिर रोड वांद्रे पश्चिम येथे कार्यालयाचे उद्घाटन केले व दुपारनंतर वांद्रे पश्चिम भागातील हिल रोड शाखा ते नर्गिस नगर पदयात्रा काढण्यात आली. वर्षा गायकवाड यांच्या पदयात्रेत इंडिया आघाडीतील घटक पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या पदयात्रेला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. इंडिया आघाडीचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन काँग्रेस पक्षाच्या ‘५ गॅरंटी, २५ न्याय’ ही न्यायपत्रे देऊन लोकांमध्ये जनजागृती करत आहेत.