प्रतिनिधी : शिरोळ तालुका जनता दल सेक्युलरच्या वतीने महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिरोळ येथे ‘शेतकरी कर्जमुक्ती अभियान मेळावा’ तसेच तालुक्यातील पत्रकारांचा भव्य सत्कार व जनसेवक पुरस्काराने सन्मान सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यात डॉ. दगडू माने यांना समाजभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले. माजी आम. शहाजहाँन डोंगरगावकर (उपाध्यक्ष – कर्नाटक प्रदेश जनता दल सेक्युलर) हे समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते.
या भव्य समारंभात शिरोळसह इचलकरंजी व कोल्हापूर येथील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने जनता दल सेक्युलरमध्ये प्रवेश केला. पक्षाचा प्रदेशाध्यक्ष या नात्याने नाथाभाऊ शेवाळे यांनी त्यांचे स्वागत केले व त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रचंड संख्येने उपस्थित असणाऱ्या पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिकांशी त्यांनी संवाद साधला. ‘शेतकऱ्यांना फक्त कर्जमाफीच नव्हे तर शेतकरी कायमचा कर्जमुक्त झाला पाहिजे, या प्रकारची धोरणे राबवण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत. पत्रकार, राजकीय पक्ष, सामाजिक संघटना सर्वांनी त्यासाठी आपलं योगदान दिलं पाहिजे.’ असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले.
यावेळी पुरस्कार प्राप्त डॉ. दगडू माने व तालुक्यातील सर्व पत्रकार यांचा नाथाभाऊ शेवाळे यांनी सन्मान केला व अभिनंदन केले. या समारंभाचे निमंत्रक जनता दल सेक्युलर सरचिटणीस प्रविणभाई माणगांवे हे होते. या भव्य समारंभास महाराष्ट्र व कर्नाटकातील माजी आमदार, खासदार, नगराध्यक्ष, ज्येष्ठ नेते, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक प्रचंड संख्येने उपस्थित होते.