प्रतिनिधी : अयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिर निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावणारे, राम जन्मभूमी समितीचे ज्येष्ठ विश्वस्त तथा राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र समितीचे कोषाध्यक्ष परमपूज्य स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांच्या पावन हस्ते ‘लढवय्या’ या पुस्तकाचे प्रकाशन संपन्न झाले. हे पुस्तक ज्योतिष विद्यावाचस्पती विजयकुमार स्वामी यांनी लिहिले असून भक्ती प्रकाशनतर्फे प्रकाशित करण्यात आले आहे.
‘लढवय्या’ या ग्रंथात महाराष्ट्रातील समकालीन राजकारणातील सर्वात प्रभावशाली नेते, नगरसेवक, महापौर, विरोधी पक्षनेते अशी राजकीय पायरी चढत विक्रमी बहुमतासह पुन्हा मुख्यमंत्रीपदावर विराजमान झालेले देवेंद्र फडणवीस यांच्या वादळी राजकीय प्रवासाचा आणि व्यक्तिमत्त्वाचा आलेख रेखाटला आहे.
स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी या पुस्तकाबद्दल समाधान व्यक्त करत, “फडणवीस यांच्या व्यक्तिमत्त्वाची योग्य दखल या ग्रंथात घेतली आहे,” असे गौरवोद्गार काढले. यावेळी महाराजांनी लेखक विजयकुमार स्वामी यांना कृपावस्त्र व ग्रंथ देऊन सन्मानित केले.
या कार्यक्रमास युवा उद्योजक व भक्ती प्रकाशनचे मार्गदर्शक नारायण चव्हाण उपस्थित होते.