सातारा(अजित जगताप) : माणसाच्या रक्तात माणुसकी असेल तर त्याला कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही. उलट प्रेरणा मिळते. खटाव तालुक्यातील आदर्श गाव निढळ येथे सातारा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये मुख्याध्यापक पदावर कार्यरत असणारे गुरुजन श्री दीपक भुजबळ यांनी सत्तावन वेळा रक्तदान केले .आपल्या बुद्धी सोबतच शारीरिक क्षमतेचे ही दर्शन घडवले आहे. याबद्दल अनेक मान्यवरांनी त्यांचे मनापासून कौतुक केले आहे.
शिक्षण क्षेत्राचा वारसा लाभलेल्या दिपक शंकरराव भुजबळ गुरुजी यांचे आजोबा विठ्ठल भुजबळ यांनी सुद्धा शिक्षक म्हणून एक पिढी घडवली होती. त्यांच्याच वारसा श्री शंकरराव भुजबळ यांनी पुढे घेऊन गेले. आज दिपक भुजबळ सुद्धा शिक्षण क्षेत्रात नावलौकिक प्राप्त करत आहेत. तिसऱ्या पिढीने हॅट्रिक केली. भुजबळ घराण्याची चौथी पिढी उच्च शिक्षण घेऊन सामाजिक कार्यामध्ये स्वतःला झोकून देत आहे.
सातारा तालुक्यातील कोंडवे गावचे सुपुत्र असलेल्या श्री दीपक भुजबळ यांनी प्राथमिक शिक्षक म्हणून सेवा करण्यास सुरुवात केली. गोरगरीब, कष्टकरी, शेतमजूर, दलित अशा गावकुसाबाहेरील विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लावण्यासाठी त्यांनी व्यक्तिगत परिश्रम घेतले. वेळेप्रसंगी स्वतःचे वेतन सुद्धा खर्च करून त्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले. शाहूपुरी, कोंडवे ,हामदाबाज, म्हाते खुर्द, ठोंबरेवाडी, गाढ वली, बामणोली ,आणि सध्या निढळ अशा अनेक ठिकाणी त्यांनी सेवा बजावली. सातारा जिल्ह्यामध्ये गेल्या ३७ वर्षाच्या कालखंडामध्ये त्यांनी अनेक विद्यार्थी घडवले. आजही गुणवत्ताधारक विद्यार्थी श्री दीपक भुजबळ यांच्यासमोर नतमस्तक होत आहेत .हीच त्यांच्या कामाची पोहचपावती आहे. शासनाचा पुरस्कार मिळवण्यापेक्षा समाजाने दिलेला पुरस्कार कधीही श्रेष्ठ असतो. हे त्यांच्या कार्याने दाखवून दिले आहे.
१९८५ साली त्यांनी पहिले रक्तदान केले. आणि नेमके ४० वर्षांनी त्यांनी ५७ व्या वर्षी ५७ वे स्वतः रक्तदान केले. व पत्नी सौ . कांचन दिपक भुजबळ आणि मुलगा ओमकार भुजबळ, कन्या कुमारी क्रांती भुजबळ यांनी मरणोत्तर देहदान करून आपल्या देहाचाही उपयोग समाजासाठी व्हावा. असे सकारात्मक दृष्टिकोन ठेवला आहे.
आज अनेकदा रक्ताचा तुटवडा भासत आहे अशा वेळेला श्री दीपक भुजबळ हे स्वयंस्फूर्तीने रक्तदान करण्यास जात आहेत. याचबरोबर सामाजिक बांधिलकी म्हणून साक्षरता प्रसार, साक्षरता वारी अशा उपक्रमामध्येही ते सहभागी होत आहेत.
स्वच्छ सुंदर प्राथमिक शाळा करण्यासाठी त्यांनी स्वतः हातात झाडू घेऊन शाळा स्वच्छ करण्याची मोहीम राबवली. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे असे समजून ते प्रत्येक ठिकाणी वृक्षारोपण सुद्धा करत आहेत. त्यांच्या या कार्याचा अनेक संस्थेने गौरव केला आहे.
लहान मुलांचे पाण्यात बुडण्याचे प्रमाण उन्हाळ्यामध्ये जास्त होत असते. याचा शोध घेऊन त्यांनी गोरगरिबांच्या मुलांना मोफत लाईफ जॅकेट देऊन त्यांना पोहण्यास शिकवले. आज अनेक मुलं, मुली राष्ट्रीय खेळाडू म्हणून तसेच लष्करामध्ये सेवा बजावत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज – फुले- शाहू- आंबेडकर विचाराचा वारसा जपणाऱ्या गुरुजन श्री दीपक भुजबळ यांनी खऱ्या अर्थाने बहुजन समाजामध्ये रक्तदान व मरणोत्तर देहदान दीप ज्योत पेटवला आहे. त्यांची भावजय सौ अरुणा किरण भुजबळ या शिक्षण विभागातील एस. सी. इ. आर. टी. सहाय्यक संचालक म्हणून पुणे येथे कार्यरत आहेत. श्री भुजबळ यांच्या या यशामध्ये त्यांच्या कुटुंबीयांचा खूप मोठा वाटा आहे त्याबद्दल त्यांनी कुटुंबीयांना ही धन्यवाद दिले आहेत.
——————————
फोटो– श्री दिपक शंकरराव भुजबळ गुरुजी