मुंबई (पी.डी. पाटील)- मराठी साहित्य क्षेत्रातील अग्रणी असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ सुरेश भिवाजी पाटील यांची निवड करण्यात आली आहे, साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शरद गोरे यांनी नुकतेच त्यांना निवडीचे पत्र दिले.
श्री सुरेश पाटील यांचे “तुझ्यासाठी” आणि “फक्त तुच” असे मराठी काव्यसंग्रह प्रकाशित असून इंग्रजी व्याकरणाचे “माय इंग्लिश ग्रामर बुक” हे पुस्तक प्रकाशीत आहे. तसेच राष्ट्रीय गौरव पुरस्कार, राष्ट्रीय समाजसेवा रत्न पुरस्कार, काव्य रत्न पुरस्कार आणि शिवछत्रपती समाजसेवा पुरस्कार अशा अनेक महत्वपूर्ण पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आले आहेत.
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून, मराठी साहित्य संवर्धनाचे कार्य सिंधुदुर्ग जिल्ह्यात अधिक रचनात्मक पद्धतीने करणार असल्याचा मनोदय साहित्य परिषदेच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष श्री सुरेश भिवाजी पाटील यांनी व्यक्त केला आहे.