प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीत मतदान वाढावे यासाठी निवडणूक आयोगाकडून मोठ्या प्रमाणावर आणि विविध स्तरांवर प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून
कल्याण लोकसभा मतदारसंघातील 142- कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात थेट वासुदेवांमार्फत मतदारांमध्ये मतदानाबाबत जागृती अभियान राबविण्यात आले.
गेल्या काही लोकसभा निवडणुकांमध्ये कल्याण लोकसभेमध्ये मतदानाचा टक्का मोठ्या संख्येने घसरला आहे. विशेष म्हणजे या भागातील सुशिक्षीत लोकांचे प्रमाण अधिक असूनही कमी होणारे मतदान ही लोकशाही आणि मतदानाच्या अधिकाराच्या दृष्टीने चिंतेची बाब ठरली आहे. यासाठी गेल्या महिन्याभरापासून मतदानाचा हा टक्का वाढविण्यासाठी कल्याण लोकसभेत निवडणूक आयोगाकडून विविध प्रकारचे जनजागृती अभियान राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वासूदेवांमार्फत मतदारांमध्ये जनजागृती करण्यात आली.
सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गोपीनाथ ठोंबरे आणि अति.सहा. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. स्वाती घोंगडे यांचे मार्गदर्शनाखाली स्वीप पथकातील (मतदार जनजागृतीपथक ) महापालिकेचे शिक्षणाधिकारी तथा नोडल अधिकारी विजय सरकटे (स्वीप) यांच्या अधिपत्याखाली तिसगाव, तिसाई बिल्डिंग, जरीमरी मंदिराजवळ, सप्तगिरी टॉवर लोकग्राम, साईश्रद्धा टॉवर लोकग्राम, श्रीराम क्लासेस, कर्पे बंगला, कर्पेवाडी, देवीदयाल टॉवर, कोळसेवाडी मच्छि मार्केट, एफ केबिन, मिलिंदनगर, शिवाजी नगर, वालधुनी या परिसरात वासूदेवांमार्फत पथनाट्य सादर करुन मतदानाबाबतचे आवाहन करण्यात आले. “मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो”, आम्ही मतदान करणार आणि तुम्ही पण मतदान करा अशा विविध प्रकारच्या घोषणा वासुदेवांमार्फत देण्यात आल्या. तसेच मतदान जनजागृतीपर गीत वाजवूनही मतदान करणेबाबतचा संदेश प्रसारीत करण्यात आला.
यासमयी स्वीप टिमचे कर्मचारी स्टुडंट ऑयकान प्रणव देसाई, समाधान मोरे, विलास नंदनवार, सर्जेश वेलेकर, अजय खंडाळे, मिडीया टिमचे उमेश यमगर, निलेश चव्हाण उपस्थित होते.